अहमदनगर : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या संचालकपदाच्या 21 जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत 16 संचालक आधीच बिनविरोध निवडून आलेत. त्यात उर्वरीत महाराष्ट्र विभागातून राजेश परजणे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडे बहुमत असताना महानंदच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे यांना आपले सख्खे मेहुणे राजेश परजणे यांची वर्णी लावता आली.
महानंदवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कायम वर्चस्व राहिले आहे. आता महानंद अडचणीत आला असून. दूध संकलन, वितरण कमी झाल्यामुळे कामगारांचे पगार भागविण्याइतकीही आर्थिक ताकद महानंदमध्ये राहिली नाही. महानंद अडचणीतून बाहरे यावे, यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे महानंदची सर्व सूत्रे दिली. त्यामुळे, महानंदच्या अध्यक्षपदी विखेंनी राजेश परजणे यांची वर्णी लावली.
राजेश परजणे नेमके आहे तरी कोण?
परजणे हे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष म्हणून सद्या कार्यरत आहेत. याशिवाय अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीसह अर्थ समिती, जिल्हा नियोजन समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अशा विविध समित्यांवर त्यांनी काम केलेले आहे.
तसेच भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन (आनंद) गुजरात या डेअरीचे संचालक तसेच कॅनरा बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. अनेक सहकारी, शासकीय, निमशासकीय संस्थांबरोबरच शिक्षण संस्थांवर ते सथा कार्यरत आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या संचालकपदावर परजणे यांची सलग दुसऱ्यांदा निवड झालेली असून या निवडीबदल दुगधविकासमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जि. प. च्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, महासंघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रबापू जाधव आदिनी अभिनंदन केले.