इतिहासात पहिल्यांदाच! निवडणूक अधिकाऱ्यांनी घरी जाऊन पूर्ण केली शरद पवार यांची राज्यसभा उमेदवारी प्रक्रिया

महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारे प्रत्यक्ष उपस्थित न राहता त्यांनी आपला अर्ज सादर केल्याने या प्रक्रियेची विशेष चर्चा रंगली आहे.

Untitled Design 135

Untitled Design 135

Election officials completed Sharad Pawar’s Rajya Sabha nomination : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा आणि लक्षवेधी प्रसंग घडला. महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारे प्रत्यक्ष उपस्थित न राहता त्यांनी आपला अर्ज सादर केल्याने या प्रक्रियेची विशेष चर्चा रंगली आहे.

तब्येतीच्या कारणामुळे शरद पवार हे स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनुसार आवश्यक असलेली शपथ त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेण्यात आली. जे. जे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय सुरवसे यांनी पवार यांच्या घरी जाऊन त्यांची शपथ घेतली. त्यानंतर पवार यांचे प्रस्तावक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधिमंडळात जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केला.

कायद्याच्या तरतुदीनुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. 1968 साली सुप्रीम कोर्टात झालेल्या पशुपतीनाथ विरुद्ध हरिहर प्रसाद सिंग या प्रकरणातील निकालानुसार, उमेदवार वैध कारणास्तव प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसेल तर संविधानाच्या कलम 84 (अ) अंतर्गत विहित नमुन्यात शपथपत्र सादर करून उमेदवारी अर्ज दाखल करता येतो. त्यानुसारच पवार यांचा अर्ज सादर करण्यात आला.

मोठी बातमी! धर्मांतर विरोधी विधेयक मंजूर, कायद्यात जबरदस्तीने धर्मांतरणास अटकेच्या तरतुदीची शक्यता

दरम्यान, या निवडणुकीत एक मोठा ट्विस्टही समोर आला. सुरुवातीला दोन उमेदवार देण्याची चर्चा असलेल्या शिवसेनेने अखेर एकच उमेदवार दिला. शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर रोहित टिळक यांनी अर्ज भरला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सात राज्यसभा जागांसाठी अखेर सातच उमेदवारी अर्ज दाखल झाले.

यामध्ये भाजपकडून चार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक, शिवसेनेकडून एक आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचा अर्ज दाखल झाला आहे. परिणामी, सात जागांसाठी सातच उमेदवार असल्याने ही राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीसाठी शरद पवार यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एक अर्ज पक्षाकडून तर दुसरा अपक्ष म्हणून दाखल करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ही पद्धत अवलंबली जाते.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे पार्थ पवार आणि शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांनीही प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. एखादा अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद झाल्यास दुसरा अर्ज कायम राहावा यासाठी ही खबरदारी घेतली जाते. एकूणच, राज्यसभेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत यंदा एक वेगळा आणि ऐतिहासिक प्रसंग घडला. तब्येतीच्या कारणामुळे उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकला नाही आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याच्या निवासस्थानी जाऊन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली, अशी घटना महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Exit mobile version