Election Results 2026 : देशाच्या राजकीय भविष्यासाठी निर्णायक ठरणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. प्रादेशिक अस्मिता, विकासाचे मुद्दे आणि सत्तांतराची शक्यता यांवर लढल्या गेलेल्या या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय भविष्य पणाला लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत असून, सलग चौथ्यांदा सत्ता राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपला बंगालमध्ये सत्तेत आणण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. विक्रमी सुमारे 92 टक्के मतदान झाल्यामुळे निकाल अधिकच उत्सुकतेचा ठरत आहे.
पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी निवडणूक झाली असून बहुमतासाठी 148 हा जादुई आकडा आहे. भवानीपूर, नंदीग्राम आणि फाल्टा या महत्त्वाच्या मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सट्टा बाजार आणि एक्झिट पोल्सनुसार राज्यात सत्तांतराची शक्यता व्यक्त केली जात असली तरी तृणमूल काँग्रेसने 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीपूर्वीच वातावरण तापले, टीएमसी आणि बीजेपी समर्थकांमध्ये जोरदार राडा
तामिळनाडूत सत्ताधारी डीएमके आघाडी पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज बहुतेक एक्झिट पोल्सनी व्यक्त केला आहे. मात्र, अभिनेता विजय यांच्या ‘तामिझगा वेट्री कझगम’ या पक्षामुळे चुरशीची लढत अपेक्षित आहे. केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ सत्तेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर एलडीएफला मर्यादित यश मिळण्याचा अंदाज आहे.
आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा अंदाज सर्व एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. पुदुच्चेरीमध्येही एनडीएला सत्ता कायम राखण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुकांचे निकालही आजच लागणार आहेत. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विजयाची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर राहण्याचा अंदाज आहे. एकूणच, आजचे निकाल देशाच्या राजकीय दिशेला नवा आकार देणारे ठरणार असून, पुढील काही तासांत स्पष्ट चित्र समोर येईल.
