Download App

राज्यसभेचा सामना : ठाकरे-पवार महायुतीला ‘बाय’ देणार की ‘वचपा’ काढणार?

राज्यसभेची निवडणूक म्हटले की सर्वांना आठवते 2017 मधील गुजरातची आणि 2022 मधील महाराष्ट्रातील निवडणूक. एखाद्या वेबसिरीजलाही मागे टाकेल एवढा सस्पेन्स, ड्रामा, थ्रिलर आणि त्यानंतर लागलेला निकाल अशा गोष्टी या दोन्ही निवडणुकांमध्ये होत्या. आताही पुन्हा एकदा देशातील 15 राज्यांमधील 56 जागांसाठी राज्यसभेची (RajyaSabha Election) निवडणूक जाहीर झाली आहे. लोकसभेपूर्वी (Lok Sabha Election 2024) होणाऱ्या या निवडणुका आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जात आहेत. याशिवाय या निवडणुकांकडे पक्षनिधीची तरतूद म्हणूनही पाहिले जाते. त्यातूनच अनेक उद्योगपतीही या निवडणुका लढत असतात. त्यामुळे या निवडणुकीत नेमकी कोणाला संधी मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातही सहा जागांसाठी या निवडणुकीची घोषणा झाली आहे. मात्र गत निवडणुकांची आठवण ठेवून यंदाही अशाच रंगतादर निवडणुका होणार का? असाही सवाल विचारला जात आहे. कारण यंदा दोन पक्षांमधील फुटींनंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे. याशिवाय दोन्ही बाजूंचे संख्याबळ आणि उमेदवारांची संख्या अशा गोष्टी पाहिल्यास निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. नेमकी काय काय राजकीय समीकरणे आहेत आणि कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात, की गतवेळची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मतदान होणार की बिनविरोध उमेदवार निवडणूक येणार याच सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपण या लेखात पाहुया.

कोणाची मुदत संपत आहे?

महाराष्ट्रातून 2018 साली राज्यसभेवर निवडून गेलेल्या सहा खासदारांची मुदत दोन एप्रिल रोजी संपत आहे. यात नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि व्ही मुरलीधरन या भाजपच्या तीन, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या वंदना चव्हाण, काँग्रेसचे कुमार केतकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अनिल देसाई यांचा समावेश आहे.

कसे असणार समीकरण?

विधानसभेच्या सध्या दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे नियमानुसार एक जागा निवडून येण्यासाठी 41 मतांची गरज आहे. सध्या भाजपचे 104 आमदार आहेत. या संख्याबळानुसार भाजपच्या स्वतःच्या मतांवर दोन जागा सहज निवडून येऊ शकतात. त्यानंतर त्यांच्याकडे 22 मते शिल्लक राहतात. तर सरकारला 22 छोट्या पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. या मतांच्या मदतीने तिसरी जागाही निवडून येऊ शकते.

दुसऱ्या बाजूला सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची जागा शिंदेंच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाची जागा अजित पवार यांच्या गटाला जाणार असल्याचे निश्चित आहे. शिंदेंचे सध्या 39 तर अजितदादांचे 41 आमदार आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांवर दोघांचेही उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.

Sharad Pawar : शरद पवार पक्षाचे सदस्यच नाहीत मग, अध्यक्ष कसे?; अजित पवार गटाचा युक्तिवाद

उरलेल्या एका जागेवर 44 आमदार असलेल्या काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून जाऊ शकतो. थोडक्यात या संख्याबळानुसार महाविकास आघाडीचा एक आणि महायुतीचे पाच उमेदवार निवडून येऊ शकतो.

मात्र या मतदानानंतर काँग्रेसकडे तीन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 17, राष्ट्रवादी (शरद पवार) 12 अशी 32 मते हक्काची शिल्लक राहतात. याशिवाय महाविकास आघाडीकडे समाजवादी पक्ष दोन, कम्युनिस्ट पक्ष एक, शेकाप एक आणि एमआयएम दोन अशी सहा म्हणजेच एकूण 38 मते शिल्लक राहतात.

सातवा उमेदवार की झाकली मूठ सव्वा लाखाची?

ही मते महाविकास आघाडी फुकट जाऊ देण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे या मतांच्या जोरावर सर्वसंमतीचा एक उमेदवार पुढे आल्यास निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी मतदानात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला शिंदेच्या गटाकडून व्हीप जारी झाल्यास त्यांच्या आमदारांवर अपात्रेची टांगती तलावर येऊ शकते.

याशिवाय राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचा निकाल येत्या 15 फेब्रुवारीला लागणार आहे. या निकालातही जर व्हीपचे अधिकार अजित पवार यांच्या गटाकडे गेले आणि त्यांनी शरद पवार गटासाठीही व्हीप काढला तर त्यांच्याही आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार राहण्याची शक्यता आहे.

शिखर बॅंक घोटाळा : रोहित पवारांची ईडीकडून चौकशी तर पोलिसांकडून फाईल बंद…उलटफेर कोणाचा?

सोबतच गत निवडणुकीवेळी सातवा उमेदवार मैदानात आल्याने झालेला आमदारांचा घोडेबाजार आणि पक्षांची फाटफूट उभ्या महाराष्ट्राने पाहिली होती. याचमुळे दबक्या आवाज झाकली मूठ सव्वालाखाची ठेवून वास्तवजन्य परिस्थितीच्या आधारे महाविकास आघाडीकडून एक आणि महायुतीचे पाच असेच उमेदवार मैदानात येण्याची शक्यात आहे.

मतांचा कोटा कसा निश्चित होतो?

राज्यसभा निवडणुकीत निवडून द्यावयाच्या जागांच्या संख्येत एक ही संख्या मिसळून विधानसभेच्या जागांच्या संख्येला या संख्येने विभाजित केल्यानंतर विजयासाठी आवश्यक मतसंख्या आपल्याला मिळते. यंदा राज्यातील 6 जागांवर निवडणूक होणार आहे. म्हणजे 6 + 1 = 7 ही संख्या निवडणुकीसाठी गृहीत धरायची असते. विधानसभेच्या सध्या तीन जागा रिक्त असल्याने 285/7 = 40.71 हा विजयाचा कोटा असेल. म्हणजेच या निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला 41 आमदारांची आवश्यकता असेल.

follow us