Explanation from MP Parth Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांच्या एका प्रवासामुळे सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. व्हीएसआर एव्हिएशन या कंपनीच्या विमानाने त्यांनी प्रवास केल्याची पावती समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही बाब अधिक संवेदनशील ठरण्याचे कारण म्हणजे याच व्हीएसआर कंपनीच्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या कंपनीवर गंभीर आरोप झाले होते. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीच व्हीएसआरवर प्रशचिन्ह उपस्थित केले होते, तर जय पवार यांनी देखील या कंपनीवर कठोर कारवाईची मागणी केली होती.
एवढंच नव्हे तर डीजीसीएने व्हीएसआरच्या लियरजेट 45 मॉडेलच्या चार विमानांवर बंदी घातल्याची माहिती देखील समोर आली आहे. अशा पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी याच कंपनीच्या विमानाने प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांच्या पुण्यातील मोती बाग येथील स्नेहभोजन कार्यक्रमात ते या विमानाने पोहोचले होते. दरम्यान, या सर्व प्रकरणावर स्वतः पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलं आहे.
‘ती’ केवळ गुगली, 2029 ला पुन्हा लोकसभेच्याच मैदानात; निलेश लंकेंचा विधानसभा लढण्यावरून घुमजाव
त्यांनी सांगितलं की, मोती बाग, पुणे येथे पवार साहेबांना तातडीने भेटण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. मात्र शेवटच्य क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे व्हीएसआर एव्हिएशनचे विमान बुक करण्यात आले. पार्थ पवार यांनी स्पष्ट केलं की, विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानात बसण्यापर्यंत हे विमान व्हीएसआरच असल्याची त्यांना कोणतीही कल्पना नव्हती. ही पूर्णपणे प्रशासकीय पातळीवरील चूक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित एजंटशी असलेला करार तात्काळ रद्द करण्यात येत असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या चुका होऊ नयेत यासाठी आपल्या कर्मचारी वर्गाला स्पष्ट सूचना दिल्या असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. शेवटी त्यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका मांडत म्हटलं की, व्हीएसआर एव्हिएशनबाबत यापूर्वी घेतलेली भूमिका आज देखील कायम आहे. या कंपनी विरोधातील त्यांचा विरोध पुढे देखील कायम राहणार आहे. त्यामुळे या प्रकरणावरून निर्माण होणारा वाद हा निराधार, दिशाभूल करणारा आणि दुर्दैवी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
