Fatal accident in Satara : सातारा तालुक्यातील कासरतळे परिसरात एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला असून, आयशर ट्रक तब्बल 50 फूट खोल दरीत कोसळल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलासह तीन महिलांचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेने सातारा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कुटुंबाचे अलीकडेच पुनर्वसन झाले होते. त्यामुळे घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य नव्या ठिकाणी हलवण्यासाठी आयशर ट्रकमध्ये सामान भरले जात होते. घरातील फर्निचर, धान्य, कपडे, भांडीकुंडी आणि इतर साहित्य ट्रकमध्ये भरल्यानंतर हा ट्रक पुढे रवाना होणार होता. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकचा अचानक तोल गेला. चालकाला काही समजण्याच्या आतच ट्रक थेट 50 फूट खोल दरीत कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकचा अक्षरशः चुराडा झाला.
या ट्रकमध्ये केवळ संसारोपयोगी साहित्याचं नव्हते, तर कुटुंबातील काही पाळीव जनावरेदेखील होती. या अपघातात काही जनावरांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्रक दरीत कोसळताच परिसरात मोठा आवाज झाला आणि ग्रामस्थ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेकांनी जीवाची पर्वा न करता दरीत उतरून बचावकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न केले.
मोठा आर्थिक झटका! सीएनजीच्या दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; मध्यरात्रीपासून नवे दर लागू
या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. सुदैवाने ट्रक चालक या अपघातातून बचावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र अपघात नेमका कशामुळे झाला, ट्रकचा तोल कसा गेला, रस्त्याची स्थिती कशी होती, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पथक, महसूल विभागाचे अधिकारी आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक ग्रामस्थ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, नातेवाईकांचा आक्रोश पाहून घटनास्थळी उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले.
दरम्यान, या अपघातामुळे कासरतळे परिसरात शोककळा पसरली असून, प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याची मागणी होत आहे. ग्रामीण भागातील अरुंद आणि धोकादायक रस्ते, तसेच सुरक्षेच्या अपुऱ्या उपाययोजना यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. या अपघातानंतर परिसरातील रस्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
