Father shared a special anecdote about Vidyanand Bapat : गणेशोत्सवातील कर्णकर्कश डीजेच्या दणदणाटामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विद्यानंद यांनी डीजेविरोधात घेतलेली भूमिका योग्य असून आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहोत, असं सांगतानाच त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आई-वडिलांनी निषेध केला आहे. तसेच विद्यानंद यांना आवश्यक पोलीस संरक्षण देण्यात यावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पुण्यातील नारायण पेठेत राहणारे विद्यानंद बापट हे मूळचे रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावचे आहेत. त्यांचे वडील सुहास कृष्णाजी बापट यांनी मुलाच्या भूमिकेला पाठिंबा देताना त्याच्या लहानपणापासूनच्या अभ्यास आणि वाचनाच्या आवडीबद्दलही माहिती दिली. आपला मुलगा विद्यानंदने मांडलेली भूमिका ही योग्यच आहे व आम्ही आई वडील म्हणून त्याला समर्थनच देतो. त्याला लहानपणापासूनच वाचनाची मोठी आवड आहे. विद्यानंदचे मराठी, संस्कृत, इंग्लिश या भाषांवर प्रभुत्व आहे. अर्थशास्त्र हा त्याच्या अभ्यासाचा विषय आहे. इतकंच नाही तर विद्यानंद हा पूर्वी नास्तिक नव्हता.
मात्र वातावरण, परिस्थितीनुसार तो आता नास्तिक झाला आहे, अशी प्रतिक्रिया सुहास बापट यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनशी बोलताना दिली. विद्यानंद यांच्या कुटुंबात संस्कृत पठणाची परंपरा असल्याचंही सुहास बापट यांनी सांगितलं. विद्यानंद यांचे आजोबा कृष्णाजी बापट हे दशग्रंथी ब्राह्मण होते. त्यामुळे घरामध्ये संस्कृत पठणाची परंपरा होती. विद्यानंद यांचं इयत्ता नववीपर्यंतचं शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे झालं. त्यानंतर त्यांनी रत्नागिरीतील फाटक हायस्कूलमधून पुढील शिक्षण घेतलं, तर गोगटे कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं.
आमचे मंत्री सतत लाड पुरवण्यासाठी जात आहेत; मराठा आरक्षणावरून छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर
बी.कॉम.च्या शिक्षणादरम्यान विद्यानंद यांनी महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर त्यांनी एम.कॉम.पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि सीएची परीक्षाही दिली, अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली. विद्यानंद सध्या आपल्यापासून जवळपास 400 किलोमीटर दूर पुण्यात असल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याने घेतलेली डीजे विरोधातील भूमिका योग्य असून आपण त्याचं समर्थनच करतो, त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचा आपण निषेध करतो, असं सुहास बापट यांनी म्हटलं आहे.
विद्यानंद यांच्या आई कल्पना बापट यांनीही मुलाच्या भूमिकेला ठाम पाठिंबा दर्शवला. मुलाने घेतलेली भूमिका ही वैचारिकदृष्ट्या योग्य आहे, मुद्दा बरोबरच आहे, तो मुद्दा पुढे यशस्वी व्हावा, या गणेशोत्सवात त्याची प्रचिती यावी, असं आमचं म्हणणं आहे. तुझ्या पाठीशी आम्ही आहोतच, तू बोलतो आहे तर समोरुनही बोलणं झालं पाहिजे, असा हल्ला होता कामा नये, तसेच त्याला आवश्यक ते पोलीस संरक्षण मिळाल्यास आम्हाला मोठा दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर मत मांडल्यामुळे विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत त्यांच्या आई-वडिलांनी वैचारिक मतभेदांना हल्ल्याने उत्तर देणं योग्य नसल्याची भूमिका मांडली आहे. मुलाने घेतलेल्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा देतानाच आता त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक पोलीस संरक्षण मिळावं, अशी अपेक्षाही बापट कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
