Five people arrested in Satish Munde death case : धाराशिव, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील कलाकेंद्रांमध्ये वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वी बार्शी येथे नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमप्रकरणातून एका माजी उपसरपंचाने कारमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आता आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथील रहिवासी सतीश मुंडे (वय 37) याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तो आपल्या मित्रांसह धाराशिव जिल्ह्यातील महाकाली कला केंद्र येथे ‘बारी’ पाहण्यासाठी गेला होता. मात्र या भेटीनंतर त्याचा मृत्यू झाल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर जाहीर केलेल्या दुखवट्यात 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; निर्णयावर संशयाचे सावट
मृताच्या कुटुंबीयांनी हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांच्या फिर्यादीनुसार, सतीश मुंडे याला मित्रांनी दारू पाजून कलाकेंद्रात नेले आणि जुन्या वादाच्या रागातून त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी पोटावर व छातीवर मारहाण केली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शेख आजमुद्दीन, शेख रौफ, संजय गीते, मधुकर इंगळे आणि दत्ता तोंडे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील कलाकेंद्रात ‘बारी’ पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यापूर्वी घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कलाकेंद्रांमधील वातावरण, सुरक्षा व्यवस्था आणि वाढत्या गुन्हेगारीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
