काल रात्री फाईलवर सही केली; 100 टक्के इथेनॉल इंधनाला कायदेशीर मान्यता देत गडकरींची मोठी घोषणा

ऊस, मका आणि इतर कृषी उत्पादनांपासून इथेनॉल तयार होत असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होईल.

Untitled Design 91

Untitled Design 91

Gadkari makes major announcement : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या इंधनाला कायदेशीर मान्यता देण्यात आल्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे देशाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठे परिवर्तन घडून येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गडकरी यांनी सांगितले की, शनिवारी रात्री त्यांनी 100 टक्के इथेनॉल इंधनासंबंधी नियमावलीला अंतिम मंजुरी देणाऱ्या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. त्यामुळे आता या इंधनाच्या वापरला कायदेशीर मान्यता मिळाली असून त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशाला आयातीत इंधनावरील अवलंबित्वातून मुक्त करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारत सध्या पेट्रोलियम इंधनाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. यासाठी दरवर्षी सुमारे 22 लाख कोटी रुपये खर्च करावे लागतात. इथेनॉलचा वापर वाढल्यास हा आर्थिक भर कमी होण्यास मदत होईल. तसेच देशांतर्गत उपलब्ध संसाधनांपासून इंधननिर्मितोला चालना मिळेल आणि ऊर्जा सुरक्षा देखील अधिक बळकट होईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

धर्मशालामध्ये भारताचे वर्चस्व; पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा 7 विकेट्सने उडवला धुव्वा

त्यांच्या मते, इथेनॉल हे केवळ पेट्रोलला पर्याय नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे साधन देखील ठरू शकते. ऊस, मका आणि इतर कृषी उत्पादनांपासून इथेनॉल तयार होत असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होईल. कृषी आणि उद्योग क्षेत्रामध्ये नवे रोजगार निर्मण होतील आणि देशातील आर्थिक चक्र अधिक मजबूत होईल.

100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांच्या उपलब्धतेबाबत बोलताना गडकरी यांनी सांगितले की, अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी या दिशेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. इथेनॉलवर चालणाऱ्या नव्या चारचाकी वाहनाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, काही दुचाकी वाहने आधीच बाजारात उपलब्ध आहेत. पुढील काही महिन्यांत आणखी अनेक कंपन्या पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी वाहने ग्राहकांसाठी उपलब्ध करून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इथेनॉलच्या वापराबाबत सुरुवातीला अनेक शंका आणि गैरसमज निर्माण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. काही जणांनी इथेनॉलमुळे वाहनांचे नुकसान होते, अशी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात एक अनुभव सांगताना गडकरी म्हणाले की, एका व्यक्तीने त्यांना फोन करून आपल्या वाहनात बिघाड झाल्याचे आणि त्याला इथेनॉल कारणीभूत असल्याचे सांगितले होते. मात्र चौकशी केल्यानंतर ते वाहन डिझेलवर चालणारे असल्याचे समोर आले. डिझेलमध्ये इथेनॉलचा वापरच होत नसताना अशा प्रकारचे दावे कसे केले जातात, यावरून चुकीची माहिती पसरवण्याचे प्रयत्न दिसून येतात, असे त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांनो, मुंबईसह महाराष्ट्रात ‘या’ दिवशी दाखल होणार मान्सून; जाणून घ्या सर्वकाही

पत्रकार परिषदेदरम्यान गडकरी यांनी केंद्र सरकारच्या विकासकामांचाही आढावा घेतला. नागपूरसह देशातील विविध भागांमध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरमध्ये उभारण्यात आलेली अत्याधुनिक आरोग्य आणि शैक्षणिक केंद्रे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि विविध पर्यटन प्रकल्प यांचा उल्लेख करत त्यांनी विकासाच्या प्रक्रियेला अधिक वेग देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे स्पष्ट केले.

इथेनॉलला मिळालेली कायदेशीर मान्यता ही केवळ इंधन क्षेत्रातील सुधारणा नसून ऊर्जा स्वावलंबन, पर्यावरण संरक्षण, ग्रामीण विकास आणि आर्थिक बचत या सर्व बाबींना चालना देणारे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे गडकरी यांनी सांगितले. येत्या काळात स्वदेशी आणि पर्यावरणपूरक इंधनाच्या वापरामुळे भारत अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून पुढे येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version