एकीकडे छ. संभाजीनगरमध्ये दोन दिवासांपूर्वी उसळलेल्या दंगलीनंतर चर्चेत आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, आता पुन्हा एकदा छ. संभाजीनगर एका वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आले आहे. एका सरपंचाच्या व्हिडिओमुळे हे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
सध्या सोशल मीडियावर एका सरपंचाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात हा सरपंच गळ्यात नोटांची माळ घालून आल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर, पंचायत समितीच्या आवारात हा सरपंच पैशांची उधळण करतानाही दिसून येत आहे.
मंगेश साबळे असे पैशांची उधळण करण्यात येणाऱ्या सरपंचाचे नाव आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमी हे शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं सांगतात, परंतु फुलंब्रीच्या बीडीओ मॅडम लाचेची मागणी करत असल्याचे आरोप साबळे यांनी या व्हिडिओमध्ये केला आहे. तसेच गोरगरीब शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणीही नसल्याचे साबळे या व्हिडिओमध्ये सांगताना दिसून येत आहेत.
एवढ्यावरच साबळे न थांबता ते सांगत आहेत की, एका विहीरीच्या मंजुरीसाठी बीडीओ मॅडम, इस्टिमेटसाठी इंजिनिअर 15 हजारांची मागतात. एवढेच काय तर ग्रामरोजगार सेवकही पैशांची मागणी करतो. असे सर्वांनीच पैशांची मागणी केल्यानंतर दिवसरात्र राबणाऱ्या शेतकऱ्याने पैसा आणयचा कुठून? विहीरींसाठी शासन चार लाखांचे अनुदान देत आहे. परंतु सरकारी कर्माचारी लाखोंमध्ये पगार असूनही लाचेची मागणी करतात. मी दोन लाख घेऊन आलो आहे असे म्हणत चला आता २० विहिरींच्या मंजुरीचं काम करा असे म्हणत साबळे या व्हिडिओमध्ये आक्रोश करत पैशांचा पाऊस पाडताना दिसून येत आहेत.