Harshvardhan Sapkal’s criticism of the RSS and BJP : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत नव्याने वाद निर्माण झाला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात गुरु-शिष्याचे नाते असल्याचा दावा हा ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचा असून, इतिहासाची जाणीवपूर्वक तोडमोड करण्याचा प्रयत्न आहे. अनेक इतिहासकारांनी दोघांची प्रत्यक्ष भेट झाल्याचा ठोस पुरावा नसल्याचे नमूद केले असताना देखील काही घटक हे नाते पुढे रेटत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारे खोटा इतिहास लादण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला.
सपकाळ यांनी पुढे महाराष्ट्राच्या संत-परंपरेचा उल्लेख करत छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज आणि संत तुकतोजी महाराज यांच्या कार्यांचा संदर्भ देत सांगितले की, अशा पुरोगामी परंपरेच्या महाराष्ट्रात चुकीची ऐतिहासिक मांडणी करणे ही गंभीर बाब आहे. काही धार्मिक व्यासपीठांद्वारे अशा विचारांना चालना दिली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. राजकीय टीका करताना त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचा विपर्यास केला जात असल्याचे त्यांनी म्हटले.
लंडनला शिक्षण, केजरीवालांचे विश्वासू ते भाजपमध्ये प्रवेश; कसा आहे चढ्ढांचा प्रवास?
यावेळी त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्यांचा उल्लेख करत भगतसिंह कोश्यारी, मंगलप्रभात लोढा, सुधांशु त्रिवेदी, राहुल सोलापूरकर आणि जय भगवान गोयल यांच्या संदर्भाचा उल्लेख करत, शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यांवर कारवाई होत नसल्याची टीका केली. गोयल यांनी लिहिलेल्या आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या पुस्तकावरून देखील जनतेत संताप असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांच्या अलीकडील वक्तव्यावरूनही वाद पेटला आहे. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि मोहन भागवत उपस्थित असतानाही त्या वक्तव्याचा निषेध न झाल्याची टीका सपकाळ यांनी केली. संबंधित वक्तव्यांवर कठोर कारवाई न झाल्यास चुकीचा संदेश समाजात जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या सर्व पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत सुरू असलेला वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
