Download App

‘एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन ; Hasan Mushrif आक्रमक

कोल्हापूर : हे तर निव्वळ माझ्या बदनामीचे षडयंत्र, एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन. शेतकऱ्यांच्या मालकीच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (Kolhapur District Bank) बदनाम करण्याचे पाप करू नका. असे माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी म्हटंले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यामध्ये (Hasan Mushrif ) आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर आता हसन मुश्रीफ यांनी पलटवार करत आरोप खोडून काढले आहेत. किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर आमदारकीचा राजीनामा देईन, अशी प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

माझ्या बदनामीसाठी षड्यंत्र रचलं जात असून यामागचा बोलवता धनी लवकरच उघड करू, अशा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला. सोमय्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आमदार विनय कोरे आणि शिंदे गटाचे संचालक यांना किरीट सोमय्या यांच्याकडे पाठवणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (KDCC ED Raid) राज्य सरकारकडून ३९ हजार शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानाची रक्कम ठेव म्हणून ठेवली. या रकमेवर आमदार मुश्रीफ यांनी त्यांच्या कुटुंबीयांना आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला ४० कोटींचे कर्ज दिल्याचा आरोप करण्यात आला.

कर्जासाठी दिलेल्या रकमेचा एकही कागद नाही. तो ठेवीच्या बदल्यात कर्ज दिल्याचे म्हटलेलं नाही. शेतकऱ्यांच्या नावाने शेतकऱ्यांचे शोषण केले जात आहे. ताबडतोब विशेष लेखापरीक्षण करून संचालक मंडळ बरखास्त करावे आणि सहकार आयुक्तांनी या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप मुश्रीफ यांनी फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, सोमय्यांकडून बेताल वक्तव्य केली जात आहेत त्याचा मी निषेध करतो. त्यांनी केलेले आरोप हा निराधार आहे. शेअर, तारणावर कर्ज घेतलं, नातेवाईकांना कर्ज दिलं हे आरोप खोटे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.

कोल्हापूर जिल्हा बँकेत कोणताही गैरव्यवहार झाला नसून बदनामीसाठी षडयंत्र सुरु असल्याचेही हसन मुश्रीफ म्हणाले. व्यक्तिगत आरोप करा, शेतकऱ्यांच्या मालकीच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बदनाम करण्याचे पाप करू नका. किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर आमदारकीचा राजीनामा देईन. हे निव्वळ माझ्या बदनामीचे षडयंत्र सुरू आहे. त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आमदार विनय कोरे आणि शिंदे गटाचे संचालक यांना किरीट सोमय्या यांच्याकडे पाठवणार आहे. केवळ आरोपापोटी छापे घालण्याचे हे जागतिक रेकॉर्ड होईल.

Tags

follow us