Hi-tech rescue equipment provided to the Forest Department : जिल्ह्यातील बिबट्यांचा वावर व त्यातून होणारा मानवी संघर्ष रोखण्यासाठी वनविभाग आता पूर्णपणे सज्ज झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वनविभागाला सुमारे 8 कोटी 26 लाख रुपये किमतीची अत्याधुनिक (हायटेक) रेस्क्यू सामग्री देण्यात आली आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज या नवीन साहित्याचे लोकार्पण करण्यात आले.
आता बिबट्या किंवा इतर वन्यप्राण्यांच्या बचावकार्यासाठी वनविभागाकडे ‘अॅडव्हान्स’ टेक्नॉलॉजी आली आहे. यामध्ये अत्याधुनिक रेस्क्यू वाहने, अंधारात पाहता येणारे गॉगल्स (नाईट व्हिजन), थर्मल ड्रोन, डार्ट गन व ट्रॅप कॅमेरे यांचा समावेश आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी खास जॅकेट्स, जंगलात वापरण्याचे बूट आणि फायबरच्या ढालीही देण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, ऊस पट्ट्यात बिबट्यांचा वाढता वावर ही चिंतेची बाब आहे. संघर्षात नुकसान झालेल्यांना शासनाने आतापर्यंत पावणेसात कोटींची मदत दिली आहेच; पण केवळ नुकसान भरपाई देऊन चालणार नाही. हा संघर्ष टाळण्यासाठी वनविभाग सक्षम होणे गरजेचे होते. आज मिळालेल्या या आधुनिक साधनांमुळे वनविभागाची ताकद वाढली असून, आपत्ती काळात ते अधिक वेगाने काम करू शकतील. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्र्यांनी स्वतः या साहित्याची पाहणी करून त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वनविभागाला सुमारे 8 कोटी 26 लाख रुपयांची हायटेक रेस्क्यू सामग्री
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वनविभागाला सुमारे 8 कोटी 26 लाख रुपये किमतीची अत्याधुनिक (हायटेक) रेस्क्यू सामग्री देण्यात आली.

Untitled Design (325)