कोल्हापूरच्या ‘गोकुळ’साठी हाय व्होल्टेज लढत; सतेज पाटलांची सत्ता टिकणार की महायुती मारणार बाजी?

गोकुळसाठी 18 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे.

Untitled Design   2026 09 10T151015.245

Untitled Design 2026 09 10T151015.245

High-voltage battle for ‘Gokul’ : पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या पंचवार्षिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. गोकुळच्या एकूण 25 संचालक पदांसाठी 18 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत 5,331 प्राथमिक दूध संस्थांचे प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार 15 ते 22 सप्टेंबर 2026 या कालावधीत उमेदवारी अर्जांची विक्री आणि स्वीकृती होणार आहे.

23 सप्टेंबरला अर्जांची छाननी केली जाईल, तर 24 सप्टेंबरला वैध उमेदवारी अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारांना 25 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत अर्ज मागे घेता येणार आहेत. माघारीच्या अंतिम दिवशी म्हणजे 8 ऑक्टोबरला अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर प्रचाराचा धुरळा उडणार असून 18 ऑक्टोबरला मतदान आणि 19 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच आता गोकुळच्या सत्तेसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

यंदाची निवडणूक काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील गट विरुद्ध महायुती अशा स्वरूपाची होण्याची चिन्हे आहेत. मागील निवडणुकीत सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील विविध विरोधी नेत्यांची मोट बांधत महादेवराव महाडिक यांच्या गटाची अनेक वर्षांची सत्ता उलथवून लावली होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे मागील निवडणुकीतील मित्र आणि विरोधकांचे चित्र यावेळी पूर्णपणे वेगळे दिसणार आहे.

कुकडी बोगद्यावरून पुणे-नगरमध्ये दावे-प्रतिदावे; प्रकल्प रद्द झालाय की फक्त स्थगित? जाणून घ्या नेमका निर्णय

मागील गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील यांच्या बाजूने असलेले हसन मुश्रीफ, विनय कोरे आणि प्रकाश आबिटकर हे नेते आता महायुतीत आहेत. दुसरीकडे धनंजय महाडिक आणि अमल महाडिक यांच्यासह महायुतीतील नेत्यांची मोठी फौज एकत्र आली आहे. त्यामुळे सतेज पाटील यांच्यासमोर यंदा मोठे आव्हान उभे राहणार आहे. धनंजय महाडिक यांनी गोकुळच्या निवडणुकीत 25-0 असा विजय मिळवण्याचा दावा केला आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच राजकीय वातावरण तापले असून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे गोकुळवरील आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी सतेज पाटील यांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेषतः हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटींवर त्यांनी भर दिला आहे. बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर कोणता स्थानिक नेता कोणत्या पॅनेलमध्ये जाणार, यालाही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. गोकुळ हा केवळ दूध संघ नसून कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील एक प्रभावशाली सत्ताकेंद्र मानला जातो. त्यामुळे या संस्थेवरील वर्चस्वाला राजकीयदृष्ट्याही मोठे महत्त्व आहे.

यंदा 5,331 मतदार 25 संचालकांचे भवितव्य ठरवणार आहेत. मागील निवडणुकीत महाडिक गटाची सत्ता उलथवून गोकुळवर वर्चस्व मिळवणारा सतेज पाटील गट आपली सत्ता कायम राखणार की बदललेल्या राजकीय समीकरणांचा फायदा घेत महायुती गोकुळवर आपला झेंडा फडकवणार, याचे उत्तर 19 ऑक्टोबरला मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळच्या निवडणुकीचा रणसंग्राम केंद्रस्थानी राहणार आहे.

Exit mobile version