Download App

उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांची सुरक्षा जैसे थे! गृह मंत्रालयाचा खुलासा

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व कुटुंबियांच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही कपात केलेली नाही, असा खुलासा गृह मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्थेत कपात झाल्यासंबंधीचे प्रसारित झालेले वृत्त खोटे असल्याचेही यावेळी गृह मंत्रालाने नमूद केले आहे. (Home Ministry of maharashtra clears that there has been no cut in security arrangements for former chief minister and Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray and his family)

काय म्हंटले आहे गृह मंत्रालयाने?

शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२२ नुसार मान्यवरांना वर्गीकृत संरक्षण पुरविण्यात येते. त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येत आहे. तसेच श्रीमती रश्मी ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना झेड, तेजस ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट ही वर्गीकृत सुरक्षा पुरविण्यात येत आहे.
सदरचे वर्गीकृत संरक्षण हे केंद्रीय यल्लो बुक नियमानुसार विशेष सुरक्षा विभाग, महाराष्ट्र राज्य मार्फत पूर्णपणे देण्यात येत आहे. वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आले नाही.

काय होते वृत्त?

उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये मोठी कपात करण्यात आली असल्याचे वृत्त आज काही वृत्तवाहिन्या आणि प्रसार माध्यमांवर प्रसारित झाले होते. यात सुमारे 60 ते 70 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी कार्यरत होते. मात्र, आता या सर्वांनाच कमी करून पोलीस ठाण्यात रुजू होण्यास सांगण्यात आले असल्याचे म्हटले होते. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एस्कॉर्ट कार आणि पायलट वाहन देखील कमी करण्यात आले आहे. याशिवाय मातोश्रीवरील एसआरपीएफची सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे, असे या वृत्तामध्ये सांगितले होते. मात्र हे वृत्त खोटे असल्याचे गृहमंत्रालयाने नमूद केले आहे.

मिलींद नार्वेकरांचीही सुरक्षा कायम :

ठाकरे आणि कुटुंबियांसोबतच ठाकरे यांचे विश्वासू आणि शिवसेना (UBT) सचिव मिलींद नार्वेकर यांच्या सुरक्षेत देखील कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. यापूर्वी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, सजेत पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह आणखी काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी नार्वेकरांच्या सुरक्षेत कमालीची वाढ करण्यात आली होती. नार्वेकरांना ऑक्टोबर 2022 पर्यंत एक्स दर्जाची सुरक्षा प्राप्त होती. मात्र त्यानंतर त्यांची सुरक्षा वाय प्लस दर्जाची करण्यात आली होती. हीच सुरक्षा आताही कायम ठेवण्यात आली आहे.

Tags

follow us