तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यभरात कारवायांचा सपाटा लावला आहे. अन्नपदार्थांत भेसळ करून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांची कोणतीही गय केली जाणार नाही, अशा इशाराच त्यांनी दिला आहे. राज्यात कुठेही भेसळयुक्त खाद्यपदार्थ किंवा निकृष्ट दर्जाची औषधे आढळल्यास थेट एफडीकडे तक्रार दाखल करावी, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे. यादरम्यान तुकाराम मुंढे यांच्याकडं तक्रार करायची झाल्यास ती कशी करावी? आता त्याबद्दल माहिती समोर आली आहे.
तुकाराम मुंढेंच्या कारवाईची चर्चा का?
तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी राज्यभरातील भेसळखोर, गुटखामाफिया आणि नियमबाह्य औषध विक्रेत्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम उघडली. अवघ्या काही दिवसांतच मुंढे यांनी शेकडो आस्थापनांवर धाडी टाकून कोट्यवधी रुपयांचा माल जप्त केला. कडक शिस्त, आकडेवारीवर आधारित निर्णय आणि नियमांच्या तडजोडीशिवाय पालन ही तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. त्यांच्या कारकिर्दीतील काही गाजलेल्या निर्णयांमुळे आजही अनेक विभागांमध्ये त्यांचे नाव चर्चेत असते.
आयुक्त तुकाराम मुंढे यांची पोस्ट काय?
१५ जुलै रोजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडं भेसळयुक्त खाद्यपदार्थांची तक्रार कशी करावी, याबाबतची माहिती दिली. ते लिहितात की, सुशासन म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा वापर नव्हे, तर नागरिकांसाठी शासन अधिक सुलभ, जलद आणि उत्तरदायी बनवणे होय. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेले AI-सक्षम नागरिक तक्रार पोर्टल हे त्याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. आता कोणताही नागरिक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलून भेसळयुक्त अन्न, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधे, तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कोणत्याही उल्लंघनाबाबत तक्रार नोंदवू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता आपोआप तक्रार तयार करते, ती संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवते, विलंब झाल्यास स्वयंचलित एस्कलेशन करते आणि तक्रारीचा संपूर्ण प्रवास पारदर्शकपणे ट्रॅक करता येतो.
तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार कशी करावी?
तुकाराम मुंढे पुढे सांगतात की, नागरिकांचा सहभाग, तंत्रज्ञानाची ताकद आणि प्रशासनाचे उत्तरदायित्व यांचा संगम घडवून सार्वजनिक आरोग्य संरक्षण अधिक प्रभावी करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येक तक्रार महत्त्वाची आहे. कारण- प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे. अन्न असो किंवा औषध, फक्त बोला — तक्रार आपोआप तयार होईल. भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा बनावट, निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत तक्रार नोंदविणे आता अत्यंत सोपे झाले आहे. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासनाच्या AI-आधारित व्यासपीठावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत बोला — तुमची तक्रार स्पष्ट व पूर्ण मुद्द्यांत आपोआप तयार होईल. अन्न सुरक्षा असो वा औषध सुरक्षा — दोन्ही तक्रारींसाठी एकच व्यासपीठ आहे. यादरम्यान नागरिकांना आपली तक्रार नोंदविण्यासाठी मुंढे यांनी https://complaints.mahafda.in ही अधिकृत वेबसाईटही शेअर केली. या साईटवर जाऊन एका क्लिकवर तक्रार सबमिट करा आणि तिची स्थिती ट्रॅक करा. तुमची जागरूकता म्हणजेच सर्वांची सुरक्षा. आजच तक्रार नोंदवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
