Ahmednagar : सध्या राज्यातील विविध भागातून पंढरपूरकडे अनेक दिंड्या मार्गस्थ होत आहे. या दिंड्यांचे नागरिकांकडून मोठ्या उत्साहात स्वागत केले जात असून, नगर तालुक्यातील बुरुडगाव येथून आज (दि. 21) आषाढी दिंडीचे सवाद्य मिरवणूक काढत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. यावेळी ‘आय लव्ह नगर’ चे संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांच्याहस्ते दिंडीतील सहभागी वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, एसटीच्या विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ, प्रांताधिकारी सुधीर पाटील व ‘आय लव्ह नगर’चे संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
बुरुडगावमध्ये आज (मंगळवारी) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास विठ्ठल रुक्मिणी मंदिरा समोरील प्रांगणात अश्व रिंगण सोहळा झाला. यावेळी दिंडी नियोजन समितीतर्फे वारकऱ्यांना विम्याचे वाटप , शबनम बॅग वाटप करण्यात आले. या रिंगण सोहळ्याला जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, एसटी महामंडळाचे अधिकारी, ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी, शिक्षक आदी उपस्थित होते. सर्वात नियोजन बद्ध दिंडी ही बुरडगावची असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच बरोबर वारकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी सर्वांना केले. यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी दिंडीत सहभागी वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप केले. तसेच विणा घेऊन काहीकाळ दिंडीतही सहभागी झाले.
दीपक भवर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. या दिंडीत सुमारे अडीचशे वारकरकरी सहभागी झाले असून, यावेळी ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे अधीक्षक डॉ. संतोष यादव, दिंडी नियोजन समितीचे किशोर कुलट, जालिंदर कुलट, बापूसाहेब औताडे, नंदू टिमकारे, अक्षय लगड, शिवाजी मोढवे, अमित जाधव, संदीप तांबे, फारूक शेख, ज्ञानेश्वर गायकवाड, मेजर गोवर्धन कामीनसे, मा. सरपंच बापूसाहेब कुलट आदी उपस्थित होते.