Important decision regarding implementation of Satara gadget : पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, अशा नागरिकांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सातारा आणि औंध गॅझेटियरचा संदर्भ घेण्याची तयारी राज्य सरकारकडून सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर सातारा गॅझेट लागू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सातारा आणि औंध गॅझेटियरमध्ये कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजाचा समावेश नसल्याने, सातारा गॅझेटचा लाभ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला मिळणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे सातारा गॅझेट लागू करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. तरीही मराठा आरक्षणाबाबतचे समज–गैरसमज दूर करत सातारा गॅझेट लागू करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. याच अनुषंगाने मंत्रालयात मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. दरम्यान, सध्या हैदराबाद गॅझेट लागू केल्याने मराठा समाजातील अनेकांना कुणबी ओबीसी दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याच धर्तीवर सातारा गॅझेट लागू झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास मोठा आधार मिळणार आहे.
सातारा गॅझेट नेमकं आहे तरी काय?
1885 साली प्रकाशित झालेल्या शासकीय राजपत्राला म्हणजेच सातारा गॅझेटियरला सध्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या गॅझेटियरमध्ये सातारा जिल्ह्यातील मराठे आणि कुणबी हे वेगळे नसून त्यांची वंशपरंपरा एकच असल्याची स्पष्ट नोंद आहे. विवाह पद्धती, धार्मिक रीतिरिवाज, आडनावे आणि शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याचाही उल्लेख या गॅझेटमध्ये आढळतो.
1885 च्या सातारा गॅझेटियरनुसार 1881 च्या जनगणनेत सातारा जिल्ह्यात तब्बल 5 लाख 83 हजार कुणबी नोंद असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याही आधी, 1819 साली सातारा संस्थानचे छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांनी जातनिहाय जनगणना राबवली होती. या जनगणनेत शेती करणाऱ्या मराठ्यांची गावोगावी कुणबी म्हणून नोंद करण्यात आल्याचे पुरावे आढळतात. काही ठिकाणी मराठ्यांची कुणबी म्हणून, तर कुणबींचा मराठा म्हणून उल्लेख असल्याचेही नोंदवण्यात आले आहे. हीच पद्धत पुढे ब्रिटिश राजवटीतही सुरू ठेवण्यात आली आणि त्याच नोंदी 1885 च्या गॅझेटियरमध्ये समाविष्ट झाल्या आहेत.
राजकीय जाणकारांच्या मते, या संपूर्ण प्रक्रियेत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या डोक्यावर एक प्रकारचा ‘काटेरी मुकुट’ ठेवण्यात आला आहे. कारण सातारा गॅझेटियर आणि त्यामागील ऐतिहासिक नोंदींचा लाभ सातारा आणि पुणे जिल्ह्यातील कुणबी मराठ्यांना होणार असला, तरी सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजाला स्वतंत्र गॅझेटियरचा आधार घ्यावा लागणार आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागणार का, अशी चर्चा सध्या समाजात सुरू झाली आहे.
