ऐकावं ते नवलंच; पुण्यात महापालिका निवडणुकीत चक्क एका उमेदवाराने दुसऱ्याचा ‘एबी फॉर्म’ गिळला

आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला एबी फॉर्म मिळू नये, यासाठी थेट फॉर्मच हिसकावून तो तोंडात चावून गिळून टाकल्याची घटना घडली.

Untitled Design (184)

Untitled Design (184)

In Pune, one candidate swallowed another’s ‘AB form’ : महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची मोठी धावपळ पाहायला मिळाली. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळवणे म्हणजेच उमेदवारीची अंतिम मोहोर असल्याने, हा फॉर्म हातात पडावा यासाठी उमेदवारांनी अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत धडपड केली. अनेक ठिकाणी नाराजी, अंतर्गत वाद, तर काही ठिकाणी उघड उघड संघर्षाचं चित्र पाहायला मिळालं. अशाच स्पर्धात्मक वातावरणातून पुण्यातून एक धक्कादायक आणि अभूतपूर्व प्रकार समोर आला आहे. आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला एबी फॉर्म मिळू नये, यासाठी थेट फॉर्मच हिसकावून तो तोंडात चावून गिळून टाकल्याची घटना घडली असून, यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ही घटना पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उमेदवारी प्रक्रियेदरम्यान घडली. प्रभाग क्रमांक 36 मध्ये शिवसेनेकडून उमेदवारीवरून तीव्र वाद निर्माण झाला होता. गोंधळाच्या वातावरणात एकाच प्रभागासाठी चुकून किंवा अंतर्गत समन्वयाअभावी दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याचे समोर आले. मच्छिंद्र ढवळे आणि उद्धव कांबळे हे दोघेही त्या प्रभागातील इच्छुक उमेदवार होते.

या दोघांमधील वाद इतका टोकाला गेला की, मच्छिंद्र ढवळे यांना देण्यात आलेला एबी फॉर्म उद्धव कांबळे यांनी अचानक हिसकावून घेतला. उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकारी काही समजण्याच्या आतच त्यांनी तो फॉर्म तोंडात टाकून चावून गिळून टाकला. हा प्रकार पाहून सभोवतालच्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. काही काळ वातावरण पूर्णतः तणावपूर्ण बनले होते.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पक्षनेत्यांमध्ये हालचाली सुरू झाल्या. पक्षाच्या शिस्तीचा आणि उमेदवारी प्रक्रियेचा गंभीर भंग झाल्याची चर्चा रंगली असून, या प्रकारामुळे शिवसेनेची नामुष्की झाल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, कायदेशीर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी चाललेली ही धुसफूस आता थेट कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नापर्यंत पोहोचत असल्याचे चित्र आहे. एबी फॉर्मसाठी उमेदवारांमधील स्पर्धा किती तीव्र झाली आहे, याचे हे टोकाचे उदाहरण मानले जात असून, येत्या काळात अशा घटनांवर पक्षनेतृत्व काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version