Ranajagjitsinh Patil : देशातील पहिल्या स्वतंत्र टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या पायाभूत कामांना गती आली आहे. महायुती सरकारने त्यासाठी २४ कोटी रूपयांच्या निधी मंजुर केला आहे. कौडगावसह तामलवाडी येथील एमआयडीसीच्या पायाभूत कामांना प्रारंभ झाला आहे. तुळजापुरचा नवीन रेल्वेमार्ग, कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि २ हजार कोटी रूपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून धाराशिव जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. (Ranajagjitsinh Patil ) आपल्या जिल्ह्यात ३५ हजार रोजगार निर्मितीचे आपण पाहिलेले स्वप्न आता निर्णायक टप्प्यावर आले आहे असं प्रतिपादन तुळजापूर विधानसभेचे भाजप उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं. ते प्रचार सभेत बोलत होते.
व्यापक लोकहित डोळ्यासमोर ठेवून महत्वपूर्ण प्रकल्पांना प्राधान्याने पूर्ण करण्याकडे आपला कायम कल राहिला आहे. ठाकरे सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे धाराशिव जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले. अनेक महत्वपूर्ण आणि लोकहिताचे प्रकल्प २ वर्षांपूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ठाकरे सरकारमुळे अनेक प्रकल्प आणि योजनांना मोठी खीळ बसली होती. त्याचबरोबर, मागील २४ महिन्यांच्या कालावधीत सतत पाठपुरावा करून जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेले बहुतांश प्रकल्प आणि योजना मोठ्या वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केल असंही राणाजगजितसिंह पाटील म्हणाले आहेत.
धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी कायम कटीबद्ध; प्रचार दौऱ्यात राणाजगजितसिंह पाटलांचा शब्द
धाराशिव-तुळजापूर या रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम अपेक्षेपेक्षा अधिक वेगात सुरू आहे. ३० किलोमीटर अंतराच्या या मार्गाचे १० किलोमीटर अंतराचे पायाभूत काम पूर्ण झाले आहे. हाच वेग कायम राहिल्यास तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला जाणारा रेल्वेमार्ग २ वर्षांच्या आत पूर्ण होणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. देश आणि राज्यातील भाविकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकही तुळजापूर आणि परिसरात यावा यासाठी जाणिवपूर्वक केलेल्या कामांना आता मूर्त रूप आले आहे. २ हजार कोटी रूपयांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा उच्चाधिकार समितीकडे सादर केल्याचंही ते म्हणाले.
तुळजापूर आणि परिसरात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात १०-१५ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. कृष्णा खोर्यातील हक्काचे पाणी डिसेंबरअखेरीस रामदरा प्रकल्पात येत आहे. त्यातून १४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली आल्याने शेतीशी निगडीत रोजगार आणि अर्थकारणाला मोठे बळ मिळणार आहे. तामलवाडी येथे ३७० एकर क्षेत्रावर एमआयडीसी उभारण्याचे काम सुरू आहे. इथे १५० लघु व मध्यम उद्योजक गुंतवणूक करण्यास तयार असून त्यामुळे किमान १२ हजार रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे असंही ते म्हणाले आहेत.
कौडगाव येथे एमआयडीसीच्या माध्यमातून देशातील पहिला स्वतंत्र टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारला जात आहे यातून देखील १० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. या महत्वपूर्ण प्रकलपांच्या माध्यमातून जवळपास ३५ हजार रोजगार निर्मितीचे आपण पाहिलेले स्वप्न आता निर्णायक टप्प्यावर आले आहे. रोजगारासाठी यापुढे मोठ्या शहरात विस्थापित होण्याची वेळ स्थानिक तरुणांवर येणार नाही. आपल्या स्वतःच्या गावातच रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना आता निर्णायक रूप येत असल्याचे मोठे समाधान आहे.