मुंबई : मलाही विरोधी पक्ष नेतेपदाच्या खुर्चीवर बसायचे होते. पण छगन भुजबळ यांच्यामुळे बसता आले नाही. भुजबळ म्हणाले, जयंतराव तुम्ही पक्ष बघा, दादांना विरोधी पक्षनेते होऊ द्या आणि नंतर काय झालं ते सर्वांनी बघितलचं, असं म्हणतं अखेर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या पोटातील गोष्ट ओठावर आणली आहे. विजय वडेट्टीवर यांची विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावेळी जयंत पाटील बोलत होते. (Jayant Patil wanted to become the leader of the opposition party, but he expressed that this wish was not fulfilled)
विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वडेट्टीवार यांना त्यांच्या जागेवर स्थानापन्न केले. यानंतर बोलताना जयंत पाटील यांनी पूर्वीच्या विरोधी पक्षनेत्यांचा संदर्भ देत सभागृहात फटकेबाजी केली. तसंच 2019 मध्ये विरोधी पक्षनेता होण्याची इच्छा होती, मात्र होता न आल्याची खंतही बोलून दाखविली.
विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीची पूजा करायला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांना विचारतो कोणती पूजा केली पाहिजे. कारण जे जे त्या खुर्तीवर बसतात ते सत्तेत चांगल्या पदावर जाऊन बसतात. मलाही त्या खुर्चीवर बसायचं होतं. परंतु छगन भुजबळ यांच्या मुळे मला तिथे बसता आलं नाही. भुजबळ साहेब म्हणाले, जयंतराव तुम्ही पक्ष बघा, दादांना विरोधीपक्ष नेते होऊ द्या आणि नंतर काय झालं ते सर्वांनी पाहिलं, अशी जोरदार फटकेबाजी केली.
2019 पासूनच अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात विरोधी पक्ष नेतेपदावरुन बिनसलं असल्याच्या चर्चा होत्या. जयंत पाटील यांना विरोधी पक्ष नेते होण्याची इच्छा होती, मात्र ही इच्छा पूर्ण न झाल्याची खंत त्यांच्या मनात होती. अखेर आज ती खदखद त्यांच्या ओठांवर आली. आपल्याला विरोधी पक्ष नेते व्हायचे होते. मात्र छगन भुजबळ यांच्यामुळे होता न आल्याचं जयंत पाटील यांनी बोलून दाखविलं.