Download App

जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार : भाजपने व्हिडिओ करून सांगितली दहा कारणे

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांचे पाटील यांनी अनेकदा खंडन केले आहे. मात्र त्यांच्या राष्ट्रवादी सोडण्याच्या चर्चांना अनेकदा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतून हवा मिळत असते. अलिकडेच शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असल्याचे म्हंटले होते. अशातच आता भाजपने थेट ट्विट करुन जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडणार याची दहा कारणं सांगितली आहेत. (Jayant Patil will left ncp and join other party bjp told 10 reasons)

काय म्हंटलं आहे भाजपने ट्विटमध्ये?

  1. शरद पवारांनी जे काही निवृत्ती नाट्य रंगवलं होतं त्या नाटकात शरद पवारांनी व्यतिरिक्त बेस्ट परफॉर्म केलं ते जयंत पाटलांनी. किती रडले होते ते. पण आता जाणवतं ते अश्रू खरे होते, फक्त कारण वेगळं होतं आणि म्हणूनच जयंत पाटील पक्षातून बाहेर पडणार अशी कुजबूज सुरू झाली आहे. जयंत पाटलांकडे पक्षातून बाहेर पडण्यासाठी एक नाही तर दहा कारण आहेत.
  2. 2019 पासून शरद पवारांनी जयंत पाटलांना डावलायला सुरुवात केली आणि कधी कळी गृहमंत्रालय पद भूषवणाऱ्या जयंत पाटलांना जलसंधारण मंत्रीपद देऊन त्यांची नाचक्की केली.
  3. तिसरे कारण म्हणजे राष्ट्रवादीतील दोन गट. राष्ट्रवादीत अजित पवार आणि सुप्रिया सुळे असे दोन गट आणि पाटील याही गटातील नाहीत त्याही गटातील नाहीत त्यामुळे राष्ट्रवादीतील त्यांचे भविष्य अंधारातच राहिलं.

4. जयंत पाटील हे मुळातच महत्त्वकांक्षी नेते आणि त्यांना पडणारी उपमुख्यमंत्री पदाची स्वप्ने हे कोणापासून लपून राहिली नाहीत.

5. आता तर पक्षाचा राष्ट्रीयत्वाचा मानही गेला आणि सुप्रिया सुळे अध्यक्ष झाल्या. त्यामुळे अजितदादांचेच वांदे झाले. मग यांच्या स्वप्नांना कोण विचारणार?

6. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेते पद भूषवायचं होतं पण तेव्हाही त्यांची झोळी रिकामीच राहिली

7. कार्यकारी अध्यक्ष निवडताना शरद पवारांनी दोन्ही गटाला समाधानी केलं.  सुप्रिया सुळे यांना आणि अजित पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष बनवलं. जयंत पाटलांना फक्त ठेंगा मिळाला.

8. राज्याचे सर्व निर्णय अजित पवार घेतात आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय राजकारणाची धूरा शरद पवारांच्या हाती आहे. त्यामुळे जयंत पाटील नाममात्र प्रदेशाध्यक्ष आहेत.

9. शरद पवार चुकून कधी निवृत्त झालेच तर स्वतःला वरिष्ठ समजणारे जयंत पाटील यांना सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या हाताखाली काम करणे कठीण होईल.

10. जयंत पाटील यांना आता शरद पवारांसारखं स्वतःच्या मुलाला राजकारणात पुढे आणायचा आहे. नुकतंच प्रतीक जयंत पाटील याला राजारामबापू पाटील साखर कारखानाचा अध्यक्ष म्हणून निवडून आणले आहे. पण स्वतःच्या पुतण्याला डावलणारे शरद पवार जयंत पाटील यांच्या मुलाला थोडेच पुढे येऊन देणार.

संजय शिरसाट काय म्हणाले होते?

शरद पवार यांनी ज्यावेळी राजीनामा दिला त्यावेळी जयंत पाटील का रडत होते, तुम्हाला माहित आहे का ? कारण त्यांना माहित आहे, उद्या शरद पवार साहेब तुम्ही राजीनामा दिला तर मी काय करू ? मी तर मेलोच, म्हणून ते रडत होते बाकी काही नाही. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे ते रडत नव्हते त्यांचं रडणं वेगळंच होतं. हे असे जे बोलणारे असतात ना ते पटकन उड्या मारतात. म्हणून काही दिवस वाट पाहा, तुम्हाला त्यांचे मार्गक्रमण कुठेतरी झालेले दिसेल, असे शिरसाट म्हणाले.

Tags

follow us