Download App

J. P. Nadda : पुण्यातून ठरणार भाजपची रणनीती; जे. पी नड्डा करणार नव्या टीमला मार्गदर्शन

  • Written By: Last Updated:

पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J P Nadda) येत्या 18 मे रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुण्यातील (Pune) बालगंधर्व रंगमंदिर येथे भाजपच्या नवनिर्मित राज्य कार्यकारिणीची बैठक नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. दरम्यान, नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका लागण्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. (BJP national president J P Nadda will on May 18 address the concluding session of the state executive meeting of the party’s Maharashtra unit in Pune)

भाजपचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणाऱ्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील भाजपचे सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही संख्या 1200 च्या घरात जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यावेळी जे. पी. नड्डा मंत्री गटाची देखील बैठक घेणार आहेत. तसेच बालगंधर्व येथील बैठक संपल्यानंतर साडे पाच वाजता राज्यातील खासदार आणि आमदार यांची घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरी येथे बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आहे.

नवीन टीमला नड्डा करणार मार्गदर्शन :

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईतील भाजप मुख्यालयात राज्यातील पक्षाच्या नव्या टीमची घोषणा केली. नव्याने टीममध्ये 16 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस, 16 सचिव, 64 सदस्य, 236 विशेष निमंत्रित आणि 512 निमंत्रितांचा समावेश आहे. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “नड्डा या नवनिर्मित राज्य भाजप कार्यकारिणीला संबोधित करतील.”

पुण्यातच बैठक का?

राजकीय जाणकारांच्या मते पश्चिम महाराष्ट्र हे भाजपसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. भाजपसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे आव्हान आहे. पश्चिम महाराष्ट्र किंवा पुणे विभागात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश होतो. राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 11 जागा पश्चिम महाराष्ट्रात येतात. 2019 मध्ये, या 11 लोकसभेच्या जागांपैकी भाजपने 5 आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 3 जागा जिंकल्या आहेत.

Tags

follow us