Download App

K. Chandrashekhar Rao यांचा ‘अब की बार किसान सरकार’चा नांदेडमधून नारा

नांदेड : देश स्वतंत्र होऊन ७०-७५ वर्षे होऊन गेली. या देशात फक्त काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) याच दोन पक्षांनी सत्ता उपभोगली. या दोन पक्षातील लोकं आमदार (MLA), खासदार (MP) आणि मंत्री (Minister) झाले. पण या देशातील शेतकरी (Farmer) आहे तेथेच आहे. या पक्षांनी आपल्याला धर्म, जातीच्या नावाने भडकवले. शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या एकाही पक्षाने सोडवल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना साधं शेतीसाठी पाणी, वीज मिळू शकत नाही. त्यामुळे त्याच्या शेतात काही पिकत नाही. परिणामी त्याच्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न जटील बनत गेला. त्यातून आत्महत्या होऊ लागल्या. आजमितीला महाराष्ट्रात (Maharashtra) शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. त्यामुळे यापुढे उलट चित्र या देशात उभं राहिले पाहिजे. शेतकरीच आमदार, खासदार कसा होईल, पाहिले पाहिजे. यासाठी ‘अब की बार किसान सरकार’ हा नारा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे (BRS) संस्थापक अध्यक्ष के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी नांदेड येथे दिला.

के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची पहिली सभा रविवारी (दि. ५) नांदेड येथे पार पडली. त्यावेळी के. चंद्रशेखर राव हे शेतकऱ्यांना संबोधित होते. यावेळी हजारोंच्या संख्येने नांदेड आणि आजुबाजूच्या भागातील शेतकरी उपस्थित होते.

के. चंद्रशेखर राव म्हणाले की, ७५ वर्षानंतर देशात पाणी, विजेचे प्रश्न तसेच आहे. शेतकऱ्यांसाठी पाणी, वीज हे किती महत्वाचे आहे, हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. या देशात ४२ टक्क्याहून अधिक शेतकऱ्यांची लोकसंख्या आहे. त्यामुळे या मोठ्या वर्गाचे प्रश्न सुटले पाहिजे. त्यामुळे भारत हा मूर्ख लोकांचा नाही तर बुद्धिजीवी लोकांचा देश आहे, हे आता सांगण्याची वेळ आली आहे.

आपली चूक काय झाली माहितीय का, आपण हल (शेती) चालवत राहिलो आणि कलम (पेन) चालवण्याची जबाबदारी दुसऱ्यांना दिली. त्यामुळे आपण मागे राहिलो. जयप्रकाश नारायण यांच्या एका आवाजामुळे सर्व देश एकत्र आला होता. आता ती वेळ परत आली आहे. आपण सर्व शेतकरी एकत्र येऊन या देशात खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे सरकार आले पाहिजे. त्यामुळे आपला नारा ‘अब की बार किसान सरकार’ हा आहे. तो तुम्ही घरोघरी द्या. बघा कसा बदल होतोय की नाही आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केली.

Tags

follow us