Kalpana Kharat : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरात शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाली आहे. अनेक महिन्यांपासून फरार असलेली कल्पना खरात शिर्डीतील जमीन व्यवहारातील फसवणूक प्रकरणात आज शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाली असून शिर्डी पोलिसांनी कल्पना खरातचा या प्रकरणात जबाब देखील नोंदवला असल्याची माहिती समोर येत आहे.
शिर्डीतील जमीन व्यवहारात शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी कल्पना खरातसह (Kalpana Kharat) अशोक खरातविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात अशोक खरातची (Ashok Kharat) चौकशी झाली आहे मात्र कल्पना खरात गेल्या तीन ते साडेतीन महिन्यांपासून फरार असल्याने चौकशी झाली नव्हती. तिला अटक करण्यासाठी शिर्डी पोलिसांनी अनेक पथके देखील तयार केली होती मात्र पोलिसांना काही यश आले नाही.
मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) अंतरिम जामीन मिळाल्यानंतर कल्पना खरात शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) हजर झाली आहे. कल्पना खरातने पोलिसांना या प्रकरणात काय माहिती दिली याबाबत सध्या पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
नेमकं प्रकरण काय ?
शिर्डीतील चार एकर जमीन खरेदी व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप शेतकरी रावसाहेब गोंदकर यांनी केला असून त्यांनी या प्रकरणात अशोक खरातसह पत्नी कल्पना खरात आणि अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या तपासानुसार जमीन व्यवहारासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. अशोक खरात यांनी ही रक्कम स्वतःची असल्याचा दावा केल्याची देखील माहिती समोर आली आहे. तर या प्रकरणात अरविंद बावके आणि किरण सोनवणे या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.
