एकीकडं सांगता एल निनो, पाऊस कमी अन् दुसरीकडं वारेमाफ कत्तल, भीमाशंकर प्रकल्पावरून सतेज पाटील आक्रमक

कर्जत-भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीच्या आरोपांमुळे वातावरण तापलं असून काँग्रेसचे सतेज पाटील आक्रमक झाले आहेत.

News Photo   2026 10 26T151426.553

Karjat Bhimashankar Project

Karjat Bhimashankar Project : कर्जत-भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून महाराष्ट्रात राजकीय आणि पर्यावरणीय वाद पेटला आहे. या प्रकल्पासाठी लाखो झाडांची कत्तल होणार असल्याचा आरोप होत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे. (Bhimashankar) हा प्रकल्प पर्यावरणाला पूरक असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांवर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला. प्रकल्पामुळे कोणाची उपजीविका बाधित होणार नाही आणि तशी परिस्थिती निर्माण झाल्यास पुनर्वसनाचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरुन काँग्रेसनेही सरकारला लक्ष्य केले आहे. विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून असे प्रकल्प आणले जात असल्याचा आरोप केला. एका बाजूला एल निनो आणि कमी पावसाची चर्चा केली जाते, तर दुसरीकडे निसर्गाची हानी करणारे प्रकल्प पुढे आणले जात आहेत, असे ते म्हणाले. रोजगारनिर्मितीला चालना देणारे प्रकल्प आणताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डेटा सेंटरसारख्या उद्योगांमध्ये पाण्याच्या वापराबाबतही गांभीर्याने विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

गुजरातच्या टॉरेंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी कर्जत-भीमाशंकरच्या जंगलातील अंदाजे 3 लाख झाडे तोडली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या आरोपांमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी वाढली आहे. जमीनमालकांच्या चिंता आणि पर्यावरण संरक्षणाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करुन प्रकल्प पुढे नेला जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या प्रकल्पाला सरकारकडून पक्षपातीपणे पाठिंबा दिला जात असल्याची टीका महायुती सरकारवर होत असून, जंगल आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिकांनी आपली भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर मांडली आहे. 25 ऑक्टोबर रोजी स्थानिकांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे कर्जत-भीमाशंकर परिसराचा दौरा करुन प्रकल्पाची पाहणी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या विषयावर त्यांची सभाही होणार आहे. प्रकल्पामुळे जंगल, वन्यजीव आणि स्थानिकांच्या जीवनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा अधिक तापण्याची चिन्हे आहेत.

टॉरेंट पॉवर कंपनीचा हा प्रकल्प कर्जत परिसरातील साई डोंगर भागात प्रस्तावित आहे. सुमारे 13 हजार 500 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची क्षमता 3 हजार मेगावॅट असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, प्रकल्पासाठी तीन लाखांहून अधिक झाडे तोडली जाण्याची भीती व्यक्त होत असल्याने पर्यावरणीय परिणामांबाबत चिंता वाढली आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यास पक्षी आणि वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊ शकतो, तसेच डोंगर उतारावरील मातीचे संवर्धन आणि नैसर्गिक जलप्रवाहांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पामुळे पारंपरिक शेती आणि पर्यटन व्यवसायावरही परिणाम होऊ शकतो, अशी भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. विकासाच्या नावाखाली कर्जत-भीमाशंकर परिसरातील नैसर्गिक संपत्ती नष्ट करणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्प कायद्याच्या चौकटीत पूर्ण केला जाईल आणि विरोधकांकडून चुकीचा प्रचार केला जात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एका बाजूला विकास आणि ऊर्जा साठवणुकीचा मुद्दा, तर दुसरीकडे जंगलाचे संरक्षण आणि स्थानिकांचे हित, अशा दोन भूमिकांमध्ये हा वाद अडकला आहे.

Exit mobile version