Download App

Santosh Dagde: माउंट एव्हरेस्टवर झळकले कर्जतचे नाव

Mountaineer Santosh Dagde: माउंट एव्हरेस्टवर कर्जतचे नाव झळकले आहे. कालचा (17 मे) दिवस अतिशय आनंदाचा होता. कारण कर्जतचे गिर्यारोहक संतोष दगडे (Mountaineer Santosh Dagde) यांनी एव्हरेस्ट सर केलं आहे, अशी बातमी सकाळीच आली. संतोष हे एव्हरेस्ट सर करणारे रायगड जिल्ह्यातले पहिलेच गिर्यारोहक ठरले आहेत. तेही वयाची चाळीशी पार केल्यावर, जेव्हा अनेकजण साधा जिना चढणंही टाळू लागतात.

आमच्या मातीत वाढलेला एकजण केवळ उंचावर नाही, तर जगात सर्वात उंच शिखरावर पोहोचला आहे, हे सांगताना खरंच किती अभिमान वाटत आहे. संतोष यांचं यश केवळ त्यांचं एकट्याचं नाही, त्यांच्या टीमचं, त्यांच्या कुटुंबियांचं, त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या मित्रमंडळींचं आणि गावातल्या लोकांचंही यश आहे. त्यांच्या यशानं कर्जतमध्ये, रायगडमध्ये एक नवं पर्व सुरू होऊ शकतं, अशी आशा आहे.

या जिल्ह्याला केवढ्या गडकिल्ल्यांची साथ मिळाली आहे. एकट्या कर्जतमध्ये किमान १०-१२ ट्रेक्स आहेत. आज एक रिसॅार्ट टाऊन म्हणून, फार्म हाऊसचं गाव म्हणून कर्जतला लोक ओळखू लागले आहेत. पण कर्जत हे मुळात एक ट्रेकर्स पॅरेडाईझ आहे, जिथे मुंबई परिसरातले अनेकजण आजही गिर्यारोहणाचे प्राथमिक धडे गिरवण्यासाठी येतात.

MLA cheat case : उकळलेले पैसे कुणाच्या खात्यात ठेवले? आमदारांना मंत्रिपदाची ऑफर देणाऱ्या तोतयाची कबुली

संतोष यांच्यासारख्यांनी ती ओळख टिकवली, वाढवली आहे, तिला नव्या उंचीवर नेलं आहे. पण या उंचीवर पोहोचण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करतानाही त्यांची, त्यांच्या टीमची दमछाक झाली, हे विसरता येणार नाही. 2012 साली गिरीप्रेमीच्या एव्हरेस्ट मोहिमेनंतर महाराष्ट्रात गेल्या दहाबारा वर्षांत गिर्यारोहणाचा आणखी प्रसार झाला आहे. पण आजही गिर्यारोहणाला राज्यात recognized sport म्हणून किंवा adventure sport म्हणून मान्यता नाही, ही गिर्यारोहकांसाठी पैसा उभा राहण्यातली महत्त्वाची अडचण ठरते आहे.

खरंतर डोंगररांगा असलेलं हे राज्य आहे. इथे अनेकदा अपघात वगैरे झाले की बचावकार्यात गिर्यारोहकांची मदत घेतली जाते. मग असं असताना गिर्यारोहणासाठी स्वतंत्र तरतूद का असू नये? संतोष खालच्या कॅंप टू पर्यंत पोहोचल्याचं आणि सुखरूप असल्याचं रात्री समजलं, तेव्हाच खरा सुटकेचा निश्वास टाकला. टीममधले सगळे सुखरूप असल्याचं कळेपर्यंत काही पोस्ट केलं नव्हतं. संतोष 18 तारखेला बेस कँपवर परततील, असा मेसेज त्यांची पत्नी भारती यांनी रात्री उशीरा पाठवला. टीममधले इतर दोनजण म्हणजे हेमंत आणि धनाजी 21 मे रोजी समिट पुशसाठी प्रयत्न करतील.

Tags

follow us