Kolhapur Fancy Number Plate : आपल्याकडं माणसाची ओळख कशावरून होते? तर, आडनावावरून, गावावरून की घराण्यावरून? पण कोल्हापुरात जरा वेगळाच मामला हाय बघा… इथं आडनाव सांगायची गरज नाय… फक्त गाडीचा नंबर सांगा समोरचा माणूस कुणाच्या घरातला हाय, हे लगेच कळतंय… कुणाची गाडी 9898… कुणाची 2020… कुणाची 3003… तर कुणाची 3232.. आता तुम्ही म्हणाल, एवढं काय विशेष? तर राव, विशेष एवढंच नाय… या नंबरांच्या नादापायी कोल्हापूरकरांनी यंदा तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजलेत… आता बोला… नाद खुळा म्हणायचा नाय तर काय म्हणायचं? नेमका हा सगळा प्रकार काय आहे त्याबद्दल जाणून घेऊया…
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, कोल्हापूर जिल्ह्यातलं प्रयाग चिखली गाव.. गावात फेरफटका मारायला निघालात, तर घरासमोर उभ्या असलेल्या गाड्यांचे नंबर पाहून डोळे विस्फारतील. कारण, कुणाच्या गाडीला 9898, कुणाच्या गाडीला 2020, तर कुणाच्या गाडीला 3003 नंबर विशेष म्हणजे पिसाळ कुटुंबातील अनेक गाड्यांचा नंबर 9898 आहे. त्यामुळे गावातून 9898 नंबरची गाडी गेली, की लोकांचा पहिला अंदाज काय असतो? पिसाळांचीच गाडी असणार… म्हणजे राव, बाकीच्या गावात लोक घराण्यावरून ओळखले जातात… पण या गावात गाडीच्या नंबरवरून घराणं ओळखलं जातंय आता याला म्हणायचं कोल्हापुरी स्टाईल…
आधी नंबर ठरतो… मग गाडी येते आता खरी गंमत इथंच हाय.. आपण काय करतो? आधी गाडी बघतो, आवडली की खरेदी करतो आणि मग नंबर मिळवतो. पण या फॅन्सी नंबरच्या शौकिनांचा हिशेबच वेगळाय…आधी नंबर कोणता पाहिजे ते ठरवायचं… तो मिळवायचा… आणि मग त्या नंबरवर गाडी आणायची म्हणजे गाडी दुय्यम… नंबर महत्त्वाचा…आवडता नंबर मिळाला पाहिजे, मग त्यासाठी पैसे किती लागतात, याची फारशी चिंता नाही. नंबरची हौस पूर्ण झाली पाहिजे, एवढंच…
आता जरा आकड्यांकडे लक्ष द्या… जानेवारी 2026 पासून 14 नोव्हेंबर 2026 पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 18 हजार 578 वाहनधारकांनी फॅन्सी नंबरसाठी नोंदणी केली आणि या फॅन्सी नंबरमधून शासनाला मिळालेला महसूल किती? तर तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये… म्हणजे ही केवळ गाडीच्या नंबरची हौस नाही, तर शासनाच्या तिजोरीतही मोठी भर घालणारी क्रेझ ठरली आहे.
9595, 0101, 9099, 2700 आणि 9191 अशा नंबरांनाही वाहनधारकांची विशेष पसंती मिळाली आहे. त्यात कोल्हापूरचा आरटीओ कोड म्हणजे MH 09… या कोडशी संबंधित नंबर आणि अंकांची बेरीज नऊ येणाऱ्या नंबरांनाही विशेष पसंती असल्याचं सांगितलं जातं म्हणजे आकड्यांमध्येही कोल्हापूरकरांचा स्वतःचा हिशेब हाय…
आता प्रश्न असा पडतो की, गाडी म्हणजे प्रवासाचं साधन… मग तिच्या नंबरसाठी एवढा खर्च कशाला? पण काहींसाठी गाडीचा नंबर ही केवळ नोंदणी नसते. तो प्रतिष्ठेचा विषय असतो, आवडीचा विषय असतो, तर काहींसाठी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा मार्ग असतो. कोणाला जन्मतारीख प्रिय, कोणाला लकी नंबर प्रिय, तर कोणाला एकाच अंकांची पुनरावृत्ती असलेला नंबर हवा आणि कोल्हापूरकरांच्या बाबतीत तरस ही हौस गावाच्या ओळखीपर्यंत पोहोचली आहे.
तर राव… काही गावांत घरासमोरच्या गाड्या पाहून घरची श्रीमंती कळते… पण प्रयाग चिखलीत गाडीचा नंबर पाहून घराणं कळतं.. आडनाव विचारायचं कामच नाय… नंबर बघायचा आणि ओळखायचं… आणि या नादापायी कोल्हापूर जिल्ह्यातून शासनाच्या तिजोरीत जमा झालेत तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये… आता बोला… कोल्हापूरकरांचा नाद खुळा म्हणायचा नाय तर काय म्हणायचं?
