बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, निकाल जाहीर, राज्यात कोकण विभागाची बाजी तर कोणाचा निकाल सर्वात कमी?

राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या 91.88 टक्क्यांच्या तुलनेत सुमारे 2 टक्क्यांनी घट झाली आहे.

Untitled Design (34)

Untitled Design (34)

Konkan region wins in 12th results : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज, शनिवार 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होत आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची अधिकृत घोषणा केली. यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या 91.88 टक्क्यांच्या तुलनेत सुमारे 2 टक्क्यांनी घट झाली आहे.

निकालात झालेल्या या घटीबाबत बोलताना कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं की, निकाल कमी होण्यामागे मुख्य कारण म्हणजे यावर्षी राबवण्यात आलेलं कॉपीमुक्त अभियान. परीक्षा अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने घेण्यावर भर देण्यात आला. यंदा परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मंडळाने कडक पावले उचलली. एकूण 15 एफआयआर दाखल करण्यात आले असून, जवळपास 100 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी अशा प्रकारची कोणतीही कारवाई झाली नव्हती, ही बाबही विशेष लक्षवेधी ठरली आहे.

या वर्षी राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांमधून तब्बल 14 लाख 58 हजार विद्यार्थ्यांनी 153 विषयांसाठी परीक्षा दिली. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग यंदाच्या परीक्षेत दिसून आला. विशेष म्हणजे, डिजिटल पद्धतीने निकाल जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या निकाल पाहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. निकालाच्या आकडेवारीनुसार, यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा उत्तीर्ण टक्का 93.15 टक्के असून मुलांचा 86.80 टक्के इतका आहे. दरवर्षीप्रमाणेच मुलींची कामगिरी अधिक उजवी ठरली असून, शिक्षणातील त्यांची सातत्यपूर्ण प्रगती अधोरेखित झाली आहे.

विभागनिहाय निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. 94.14 टक्के निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. याउलट लातूर विभागाचा निकाल 84.14 टक्के इतका असून तो राज्यातील सर्वात कमी निकाल ठरला आहे. तर, पुणे विभाग 91.25 टक्के, नागपूर 88.67 टक्के, छत्रपती संभाजीनगर 88.68 टक्के, कोल्हापूर 89.97 टक्के, अमरावती 90.92 टक्के, नाशिक 90.72 टक्के आणि मुंबई 90.08 टक्के.

विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यानंतर मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा सीट नंबर आणि आईचे नाव टाकणे आवश्यक असणार आहे. यंदा शैक्षणिक प्रणालीत करण्यात आलेल्या बदलांमुळे आईच्या नावाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पुढील टप्पा अधिक महत्त्वाचा असणार आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया, विविध स्पर्धा परीक्षा, तसेच करिअर निवडीचे पर्याय याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागणार आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, वाणिज्य, कला तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

Exit mobile version