Download App

रामदास कदम बंगाली बाबा, त्याचे पार्सल परत पाठवायचेय; माजी आमदार संजय कदम कडाडले..

रत्नागिरी : ‘रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणजे जादूटोणा आणि बंगाली बाबा असलेला रामदास कदम अन् त्याचे बॅनर देवमाणूस म्हणून लावलेत. त्याच्या बॅनरखाली भिकारी बसलेत. तुझ्या खोक्यात काही आले असतील तर आमच्या ताटात दे म्हणतात. अशा या रामदास कदमचे पार्सल परत मुंबईत (Mumbai) पाठवायचे हेच आमचे सध्याचे उद्दीष्ट आहे,’ असे माजी आमदार संजय कदम यांनी सांगितले.

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज खेड (जि. रत्नागिरी) येथे जाहीर सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी येथील ठाकरे गटाच्या नेत्यांनी केली आहे. या सभेची माहिती प्रसारमाध्यमांना देताना कदम यांनी माजी मंत्री रामदास कदम यांचा समाचार घेतला.

वाचा : Uddhav Thackeray : रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सभा; तोफ कुणावर धडाडणार ? 

कदम म्हणाले, की ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी सगळे काही दिले. त्यांच्या मुलासह कुटुंबियांना विविध पदे दिली. तेच नतद्रष्ट रामदास कदम आज उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका करत आहेत. त्यामुळे कोकणात प्रचंड नाराजी आहे.  ठाकरे कुटुंबियांवर टीका करण्याची हिंमत आजवर कुणीच केलेली नाही. त्यामुळे या प्रकाराबाबत कोकणवासियात प्रचंड चीड आहे.

आता जे सरकार आहे. त्यांच्याकडून उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांवर सातत्याने टीका केली जात आहे. त्यांना काही वाईट प्रवृत्तींनी त्रास दिला. त्यातून हे सरकार गडगडले. त्यानंतर मी आणि आ. भास्कर जाधव उद्धव ठाकरेंना जाऊन भेटलो. या परिस्थितीत त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने मी पक्षप्रवेश करत आहे. याबाबत मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा केली आहे, असे माजी आमदार कदम यांनी पक्षप्रवेशाबाबत सांगितले.

विरोधक या सभेवर टीका करत आहेत. सभेला जाऊ नका म्हणत लोकांवर दबाव टाकत आहेत. रामदास कदम आणि त्यांचे चेलेचपाटे हे उद्योग करत आहेत.पण तरीही उद्धव ठाकरेंची सभा होणार यात काहीच शंका नाही. रामदास कदमांचे पार्सल परत मुंबईत पाठवायचे हेच आमचे सध्याचे उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

Tags

follow us