रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीत राजकीय (Raigad) उलथापालथ झाली आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी नगराध्यक्षपदी निवडून आलेले शिंदे गटाच्या शिवसेनेचे शाहीद जंजीरकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा सादर केला. आपण कोणत्याही दबावाखाली नसून स्वखुशीने राजीनामा दिला असल्याचं जंजीरकर यांनी स्पष्ट केलं असलं तरी काहीतरी घडलय अशी चर्चा सुरू आहे.
शाहीद जंजीरकर यांच्या या अचानक निर्णयामुळे रायगडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सात नगरसेवकांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील शेडगे यांचा पराभव करून नगराध्यक्षपद मिळवले होते. मात्र, या विजयानंतर चारच दिवसात त्यांना पद सोडावे लागल्यानं शिवसेनेतील अंतर्गत दबाव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या राजकीय रणनीतीची चर्चा सुरू झाली आहे.
म्हसळा नगरपंचायतीच्या 17 सदस्यीय सभागृहात शिवसेनेला 9 जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे गेली दहा वर्षे असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शाहीद जंजीरकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेडगे यांचा पराभव केला. हा निकाल खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात होता.
सत्तांतरानंतर नगराध्यक्षांच्या दालनातून खासदार सुनील तटकरे यांचा फोटो हटवून त्या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे फोटो लावण्यात आले होते. या घटनेनंतर स्थानिक राजकारण अधिक तापल्याचं चित्र होतं. राष्ट्रवादी काँग्रेसने व्हीप जारी करून पक्षविरोधी मतदान करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला होता. शाहीद जंजीरकर यांच्या राजीनाम्यामागे शिवसेनेच्या वरिष्ठांचा दबाव होता की सुनील तटकरे यांनी राजकीय समीकरणे बदलण्यात यश मिळवले, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि श्रीवर्धन मतदारसंघातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही घटना महत्त्वाची मानली जात आहे. म्हसळा नगरपंचायतीतील ही घडामोड केवळ स्थानिक पातळीवरील बदल नसून रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटातील संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत मानले जात आहेत. आता नगराध्यक्षपदासाठी पुढे कोणाचे नाव समोर येते आणि या घडामोडींचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
