Download App

सुट्टीदिवशी कष्ट केलं, पुस्तक घेतली अन् लक्ष्मी शाळेत पहिली आली… एका संघर्षाची प्रेरणादायी कहाणी

विष्णू सानप :

घरात अठरा विश्व दारिद्र्य. आई-वडीलांचे हातावरील पोट. घरात सात पिढ्यात कोणी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं नाही. पण शिक्षणाची आवड असलेल्या लक्ष्मीच्या यश डोळे दिपणारे आहे. तिने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत 92 टक्के मार्क मिळवले. इतकंच नाही तर ती शाळेतही पहिली आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वेलतुरा हे लक्ष्मीचे मूळ गावं. तर वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील चिंचांबा-भर येथील भारत माध्यमिक शाळेतून ती प्रथम आली आहे. (Laxmi jagdish wagh stood frist is school form extreme poor condition)

लक्ष्मीला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड, मात्र, घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. घरी शेती नाही, कुटुंबाचा उदरनिर्वाह मजुरीवर. त्यामुळे लक्ष्मीच्या शिक्षणात अनेक अडथळे आले. कामानिमित्ताने आई-वडिलांचं सातत्याने होणारे स्थलांतर आणि पैशांची चणचण यामुळे पुस्तकही वेळेवर मिळायची नाहीत. घरात कुणीचं शिकलेले नसल्याने मार्गदर्शनाचा अभावही होता. मात्र तरीही आपण शिकायचंय असा मनाशी निश्चय करत ती पावलं पुढे टाकत राहिली. लक्ष्मीने पुस्तकांसाठी सुट्टीच्या दिवशी मजुरी करायचं ठरवलं आणि त्या पैशातून जुनी पुस्तके खरेदी करत अभ्यास केला. या संघर्षातून यश मिळवत तिने शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. सोबतच आपल्या अशिक्षित आई-वडिलांची मानही उंचावली आहे.

या यशाबद्दल लक्ष्मी म्हणते,

मी अभ्यास केला, पहिला क्रमांक आला. मात्र पुढचं शिक्षण काय घ्यावं? कुठे घ्यावं? आणि कसं घ्यावं? याबद्दल मला काहीही माहिती नाही.

लक्ष्मीचे वडील जगदीश आणि आई वंदना हे मजुरी काम करतात. आपली लेक दहावीच्या परीक्षेत इतके गुण मिळवेल आणि शाळेतून प्रथम येईल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. मात्र आता लक्ष्मीच्या या यशानंतर त्यांना पुढचे महागडे शिक्षण कसं द्यायचे ही चिंता त्यांना सतावत आहे.

लक्ष्मीची आई, वंदना वाघ म्हणतात, आम्ही दोघेही मजुरी काम करतो. घरी शेती नाही. सुट्टीच्या दिवशी लक्ष्मीलाही आमच्यासोबत दुसऱ्यांच्या शेतात काम करायला यावं लागतं. अशात पुढील महागडे शिक्षण आम्ही कसं द्यायचं? लेकीला पुढचं शिक्षण शिकवायचय. मोठं काहीतरी बनवायचं. पण नेमकं कसं हे माहित नाही.

Tags

follow us