विधानपरिषद निवडणूक 2026 – कोणत्या पक्षाच्या वाट्याला कोणती जागा? महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ लक्षात घेतल्यास राज्यातील बहुतांश मतदारसंघांमध्ये भाजपचे वर्चस्व असल्याचे दिसून येते.

Untitled Design 7 2

Untitled Design 7 2

Legislative Council Election 2026 : राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज किंवा उद्यापर्यंत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 17 पैकी 16 जागांवर जवळपास सहमती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून, फक्त छत्रपती संभाजीनगर-जालना या महत्त्वाच्या जागेवर अजूनही भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ लक्षात घेतल्यास राज्यातील बहुतांश मतदारसंघांमध्ये भाजपचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. त्यामुळे 16 पैकी तब्बल 10 जागांवर भाजप निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेच्या वाट्याला 4 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 2 जागा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अहिल्यानगरची जागा भाजपच्या वाट्याला गेली असून, पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला, मात्र या बदल्यात मंत्रिमंडळातील एका महत्वाच्या खात्याची तडजोड झाली असून राष्ट्रवादीने अर्थखात्यावरील दावा सोडण्यास संमती दिल्याचे सांगण्यात येते.

महायुतीच्या संभाव्य फॉर्म्युल्यानुसार ठाणे, यवतमाळ, नाशिक आणि परभणी-हिंगोली या जागा शिवसेना लढवू शकते. तर पुणे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या कोकणातील महत्त्वाच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. उर्वरित बहुतेक जागांवर भाजप आपले उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड आणि नागपूर या जागांचा समावेश आहे.

14 मृत्यूंनी राज्य हादरलं; पुणे विषारी दारू प्रकरणात मुख्य आरोपी कर्नल विरखा सिंहला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मात्र, सर्वाधिक चर्चेत असलेली छत्रपती संभाजीनगर-जालना विधानपरिषदेची जागा अद्यापही अनिर्णित आहे. या जागेवर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी दावा कायम ठेवला असून, अंतिम निर्णयासाठी वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू असल्याची माहिती आहे. आज किंवा उद्या हा तिढा सुटण्याची शक्यता असून त्यानंतर महायुतीचा अंतिम जागावाटपाचा फॉर्म्युला अधिकृतपणे जाहीर केला जाऊ शकतो.

दरम्यान, या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 1 जून असल्यामुळे महायुतीकडून लवकरच अधिकृत उमेदवारांची घोषणाही होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version