Leopard Attack In Kharekarjune : अहिल्यानगर तालुक्यात बिबट्याचा दहशतवाद दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी (दि.12) सायंकाळी खारेकर्जुने (ता. नगर) येथे घडलेली घटना सर्वांना हादरवून सोडणारी ठरली. केवळ पाच वर्षांची रियांका सुनील पवार ही चिमुरडी घरच्यांच्या डोळ्यासमोर बिबट्याने उचलून नेली. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती, पण तिचा शोध लागला नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार, खारेकर्जुने (Kharekarjune) येथील शेतात काही कुटुंबे शेतमजूर म्हणून वास्तव्यास आहेत. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास थंडी वाढल्याने काहीजण शेकोटीभोवती बसले होते. रियांका त्यांच्याजवळच खेळत असतानाच शेजारील तुरीच्या शेतातून अचानक बिबट्या झेपावत आला आणि क्षणात त्या चिमुकलीला उचलून पळून गेला. कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड करत केला पाठलाग ही घटना पाहून कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड करत पाठलाग केला, मात्र बिबट्याचा (Leopard) मागमूसही लागला नाही. काही क्षणांतच वस्तीवर लोकांची गर्दी झाली. नागरिकांनी एकत्र येऊन शोधमोहीम सुरू केली, परंतु निष्फळ ठरली. घटनेची माहिती मिळताच पोलिस व वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होतं.दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण गावावर भीतीचे सावट पसरले आहे. मंगळवारीच कामरंगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने एका बिबट्याचा मृत्यू झाला होता, आणि त्याच्यानंतर अवघ्या 24 तासांतच पुन्हा अशी भयावह घटना घडल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.
नगर तालुक्यात बिबट्याचे दर्शन, हल्ले आणि मृत्यूच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
गेल्या काही महिन्यांपासून नगर तालुक्यात बिबट्याचे दर्शन, हल्ले आणि मृत्यूच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र वनविभागाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने लोकांचा संताप वाढत चालला आहे. नागरिकांनी शासनाकडे तातडीने बिबट्यांच्या हालचालींवर नियंत्रण आणण्याची आणि ग्रामीण भागातील सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मेष ते मीनपर्यंत सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या सर्वकाही
आमच्या लेकरांना तरी सुरक्षित ठेवा; हादरलेल्या पालकांचा आक्रोश
घटनेनंतर रियांकाच्या आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. आमचं लेकरू आमच्याच डोळ्यांसमोर बिबट्याने उचलून नेलं, काहीच करता आलं नाही, असं म्हणत कुटुंब आक्रोश करत होतं.
