Download App

Aaditya Thackeray : दावोस दौऱ्याबद्दल समोरासमोर बोलू.., आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना खुलं आव्हान

मुंबई : दावोसला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath shinde) राज्यासाठी काय आणलंय, त्यासंदर्भात बोलण्यासाठी समोरासमोर या असं खुलं आव्हान युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरुन त्यांना चांगलेच धारेवर धरलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यासाठी राज्यातील जनतेचे 35 ते 40 कोटी रुपये खर्च करणं कितपत योग्य आहे. प्रत्येक दिवसाला मुख्यमंत्र्यांनी 10 कोटी रुपये खर्च केले. हे पैसे कुठे आणि कसे खर्च झाले आहेत. त्याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नसल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

तसेच जे काही प्रकल्प बनवायचे आहेत, उद्घाटन करायचे आहेत ते करा मात्र, जनतेला बनवू नका. महाराष्ट्राच्या जनतेची आणखी किती फसवणूक करणार आहात? जे काय केलं ते समोरासमोर बसून सांगा की दावोसला जाऊन नक्की काय केलं, असं खुलं आव्हानही त्यांनी यावेळी दिलंय. त्याचप्रमाणे राज्यात जे काही प्रकल्प राज्यांत येणार आहेत. त्यापैकी अनेक प्रकल्प आधीच राज्यांत येणार होते. मुख्यमंत्री दावोसला पोहोचले तेव्हा त्यांनी खूप उशिर झाला होता. उशिर न होण्यासाठी ते चार्टर विमानाने दावोसला गेले होते. एवढा खर्च करुन गेलेत खरे मग उशिरा ते का पोहोचले आहेत. असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना केला आहे.

तसेच यावेळी वारंवार आदित्य ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘असंविधानिक मुख्यमंत्री’ असाही उल्लेख करण्यात आला आहे. असंविधानिक मुख्यमंत्री एकतर दावोसाला उशिरा पोहोचले आणि तेथून तिसऱ्या दिवशी पुन्हा माघारी फिरल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. त्यांनी केलेला 40 कोटी खर्च योग्य आहे का? उशिरा पोहोचणं गरजेचं आहे का? करार झालेले घोषित केलंय तरीही तेच प्रकल्प पुन्हा दाखवत आहेत. जे काही प्रकल्प महाराष्ट्राला मिळणार आहेत. त्यातून जो रोजगार मिळणार आहे, त्याच्या तुलनेत वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प मोठे होते, असंही त्यांनी यावेळी म्हंटलंय.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोसचा दौरा राज्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण होता. आम्ही सत्तेत असताना आम्हीदेखील दावोसला गेलो होतो. दावोसला जगभरातून लोकं येत असतात. मात्र, यावेळी आम्हांला काही वेगळं पाहायला मिळालं, असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार? याकडं लक्ष लागून राहिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौऱ्यातील अनेक गोष्टी प्रसारमाध्यमांसमोर आल्या आहेत. त्यांच्या दावोस दौऱ्यावरुन आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us