Licenses will cancelled of auto-rickshaw, taxi drivers in Maharashtra including Mumbai don’t know Marathi : गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यामध्ये चर्चेत असलेल्या मुंबईसह महाराष्ट्रात मराठी न येणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांचं लायसन्स रद्द करण्यावर आज अखेर शासन निर्णय येणार आहे. याबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली.
महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान अनिवार्य करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मराठी बोलता येत नसलेल्या चालकांवर कारवाई करण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात येणार असून, यासंदर्भातील शासन निर्णय आज जाहीर होण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली. मोटार वाहन कायदा आणि संबंधित नियमांमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांनुसार, महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक तेवढे मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक राहणार आहे.
Share Market : चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याची बातमी येताच TCS सह टाटा कंपन्यांचे शेअर्स घसरले
नव्या नियमांनुसार, एखाद्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला व्यवहारिक मराठी बोलता येत नसल्याचे आढळल्यास त्याला प्रथम मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली जाईल. या कालावधीतही चालकाने आवश्यक मराठीचे ज्ञान मिळवले नाही, तर त्याच्या वाहन चालविण्याच्या परवान्यावरील संबंधित अधिकृतता तीन महिन्यांपर्यंत निलंबित केली जाऊ शकते. यानंतरही नियमांचे पालन न केल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
‘मराठी शिकण्यासाठी आधीच वेळ दिला’
या निर्णयाबाबत बोलताना प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, महाराष्ट्रात व्यावसायिक काम करण्यासाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असल्याची तरतूद यापूर्वीपासूनच नियमांमध्ये आहे. मात्र, या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. काही महिन्यांपूर्वी या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यावर थेट कारवाई न करता भाषा शिकण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला. चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याचे आवाहन करण्यात आले होते. सरकारच्या आवाहनानंतर अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकण्यास सुरुवात केली असून काही चालकांनी भाषा आत्मसातही केली आहे. मात्र, अजूनही काही चालक मराठी शिकण्यास नकार देत असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाईल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅबचालकांनाही नियम लागू
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांमुळे व्यावसायिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालकांसाठी व्यवहारिक मराठीचे ज्ञान ही अट अधिक स्पष्ट करण्यात आली आहे. या नियमांच्या कक्षेत रिक्षा, टॅक्सी तसेच इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या ॲप-आधारित मोटार कॅबचाही समावेश करण्यात आला आहे. चालकांसोबतच संबंधित परवानाधारक आणि परमिटधारकांसाठीही या अटी लागू होणार आहेत. नव्या नियमांचा मुख्य उद्देश चालकांना प्रवाशांशी सहज आणि प्रभावीपणे संवाद साधता यावा हा असल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आवश्यक मराठीचे ज्ञान नसल्यास संबंधित चालकाच्या परवान्यावरील अधिकृतता निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई करण्याची तरतूद या सुधारणांमध्ये करण्यात आली आहे.
