Local Body Elections : स्थानिक निवडणुका लवकरच लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी दिवाळी मिलन कार्यक्रमांना सुरुवात केली आहे. या कार्यक्रमांचा उपयोग उमेदवार पडताळणी आणि शक्तिप्रदर्शनासाठी होत आहे. नेते कार्यकर्त्यांशी संवाद साधून संभाव्य उमेदवारांची चाचपणी करत आहेत. यातून निवडणुकीचा माहोल तापणार आहे. विजयी शक्यता असणाऱ्यांनाच संधी मिळणार आहे. याच अनुषंगाने आज महाविकास आघाडीकडून आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये इच्छुक उमेदवारांशी संवाद साधत आगामी निवडणुकांसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे.
नगर पंचायत, नगर परिषद तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे. पण लवकरच त्या लागणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. संभाव्य उमेदवारांनी मतदारसंघात हालचाल सुरू केली आहे. त्यांचा प्रचार अप्रत्यक्षपणे सुरू झाल्याचे चित्र आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असलेल्या दिवाळीच्या सणाला राजकीय रंग चढला असून, विविध पक्षांकडून आणि इच्छुक उमेदवारांकडून दिवाळी फराळ कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. या दिवाळी मिलन कार्यक्रमांचा वापर राजकीय पक्षांकडून एकप्रकारे उमेदवार पडताळणी आणि शक्तिप्रदर्शनाचे साधन म्हणून केला जात आहे. प्रत्येक वॉर्ड तसेच सर्कलमधील इच्छुक कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी जनतेशी संपर्क ठेवत आपली लोकप्रियता दाखविण्याच्या प्रयत्नात आहेत.
पक्षातील नेतेदेखील या कार्यक्रमांना उपस्थित राहत असून, स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून संभाव्य उमेदवारांची छबी जाणून घेत आहेत. राजकीय वर्तुळात चर्चेनुसार, पक्षांचे नेते आणि निरीक्षक हे या दिवाळी फराळाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा ओघ, नागरिकांचा प्रतिसाद आणि संघटनात्मक ताकद तपासून पाहणार आहेत.
अनेक ठिकाणी पक्षाचे वरिष्ठ नेते स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. या चर्चांनंतर काही सर्कलमध्ये उमेदवारांच्या नावांबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांनी अशा कार्यक्रमांना महत्त्व दिले असून, संभाव्य उमेदवारांमधील जनसंपर्क, प्रतिमा आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा यांचा तुलनात्मक आढावा घेतला जात आहे.
