माढा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यातून नाईक निंबाळकर याच आडनावाचा खासदार असण्याची शक्यता जास्त आहे. याच कारण भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीमधूनही रामराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे नाव पुढे येत आहे. राष्ट्रवादीची काल (31 मे) मुंबईत आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. यात राष्ट्रवादी लढत असलेल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. याच बैठकीत सातारा जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघाबाबत चर्चा झाली. (Madha Lok Sabha Election NCP Candidate name May Ramraje Naik Nimbalkar, Sanjeev Naik Nimbalkar)
या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, छगन भुजबळ उपस्थित होते. तर साताऱ्यातून खासदार श्रीनिवास पाटील, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, नितीन पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रभाकर देशमुख, सुरेंद्र गुदगे, दीपक पवार, नंदकुमार मोरे, मनोज पोळ, सुनील माने, राजकुमार पाटील आदी नेते उपस्थित होते.
माढा लोकसभा निवडणुकीच्या चर्चांवेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यास ते सोईचे होतील, असे सुचविले अशी माहिती आहे. यावर साताऱ्यातील इतर पदाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला. मात्र शरद पवार यांनी यावर साधव प्रतिक्रिया देत दोन्ही पैकी एका नाईक निंबाळकरांचे नाव निश्चित केले जाईल, पण सोलापूर जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल अशी भूमिका घेतली. यामुळे राष्ट्रवादीकडूनही नाईक निंबाळकरच उमेदवार म्हणून नाव पुढे येणार हे निश्चित झाले आहे.
2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत माढा मतदारसंघाची निर्मिती झाली. यामध्ये पंढरपूर मतदारसंघातील बहुतांश भागाचा समावेश झाला. तसंच नव्याने फलटण, माण हे तालुके आणि खटाव, कोरेगाव तालुक्यातील काही भाग जोडण्यात आला. यात करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील 4 आणि फलटण, माण हे सातारा जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. वास्तविक हे सर्व तालुके राष्ट्रवादीबहुल असल्याने 2009 मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि 2014 रोजी विजयसिंह मोहिते पाटील मोठ्या मतांनी विजयी झाले होते. 2019 मध्ये माढा भाजपने काबिज केला. आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँंग्रेसकडे आणण्यासाठी रणनीती तयार करण्यात येत आहे.