Download App

Video : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; 60 जण ढिगाऱ्याखाली अडकले

भिवंडी शहरातील वलपाडा परिसरात एक तीन मजली इमारत अचानक कोसळली. या दुर्घटनेत 50 ते 60 जण या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर या विभागांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 50 ते 60 जण अडकले आहेत. ग्राउंड फ्लोअर आणि दोन मजले अशी इमारत होती. अग्निशमन वाहने आणि एनडीआरएफ, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आज दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. वलपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत वर्धमान नावाची तीन मजली इमारत होती. त्या इमारतीच्या तळ मजल्यावर एक गोडाऊन होते. त्या गोदामात 30 हून अधिक लोक काम करत होते. तर वरील सर्व मजल्यावर सर्व कुटुंब राहत होती. ही इमारत कोसळ्याने यात 50 ते 60 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

भिवंडी अग्निशामक दालाच्या जवानांनी तेथील ढिगारा हटविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. आतापर्यंत इमारतीत अडकलेल्या एकाही व्यक्तीला बाहेर काढण्यात आलेले नाही. त्यामुळे जिवीतहानीची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, इमारत कशामुळे कोसळली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या येथे मदतकार्य सुरू करण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात नेले जात आहे.

Tags

follow us