Chhagan Bhujbal on Nephew Sameer Bhujbal : महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाहीची जशी कायम चर्चा होत असते तितकीच किंबहूना त्यापेक्षा अधिक जास्त चर्चा आणि पुढे संघर्ष पाहायला मिळाला तो काका-पुतण्या संघर्ष. काका-पुतण्या हे राजकारणातील कधीकाळी रक्ताचे आणि सख्खे सहकारी पक्के वैरी झाल्याचं महाराष्ट्राने अनेकदा पाहिलं आहे. तुम्ही म्हणाल, यावर असं काय झालं तुम्ही इतकं बोलायला लागले. तर झालं असं की आता नवीन काका-पुतण्याचा संघर्ष महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे असं दिसतय. याचे संकेत खुद्द काकांनीच दिलेत. त्या काकांचं नाव ज्येष्ठ नेते छगन भुजबळ. ते माध्यमांशी बोलत होते.
छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना, काका-पुतण्याच्या संघर्षावर फार मोकळेपणाने भाष्य केलं आहे. भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याबद्दल प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले, सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे असं आता वाटायला लागलं आहे. पुतणे काकांचं ऐकत नाही, असं वाटत आहे. राज्यात हा संघर्ष खूप पाहायला मिळालाय असं म्हणत शरद पवार यांचे पुतणे, अजित पवार यांचे पुतणे, गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे, बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे अशी यादीच भुजबळ यांनी यावेळी वाचली.
काय म्हणालेत समीर भुजबळ?
गेले अनेक दिवस मी मतदारसंघात दौरे करत होतो. पंकज भुजबळ यांनी दहा वर्षे आमदार म्हणून काम केले. या मतदारसंघात आमचे संघटन मजबूत आहे. तालुका भयमुक्त करण्यासाठी आपण मैदानात उतरले आहोत. 2009 मध्ये नाशिकमधून खासदार म्हणून निवडून गेलो. त्या काळात अनेक विकासाचे काम केली. तसंच, छगन भुजबळ 1985 पासून आमदार आहेत. मी मुंबई प्रांत अध्यक्ष राहिलो आहे. त्यामुळे केवळ आमदार होण्यासाठी नाही तर नांदगाव मतदारसंघाची स्थिती पाहता तालुका भयमुक्त करण्यासाठी आपण उमेदवारी करत असल्याचं ते म्हणाले आहेत.
नांदगाव, मनमाड येथे पिण्याचे पाणी, स्वच्छतेची परिस्थिती गंभीर आहे. मात्र, याबाबत येथे कोणीही उघड बोलण्यास पुढे येत नाही. विद्यमान आमदार आल्यानंतर ही परिस्थिती झाली आहे. तसंच, मतदारसंघात कोणाला बोलण्याची संधी नाही. त्यामुळे लोकांनीच मला उमेदवारीसाठी आग्रह धरला. याबाबत आम्ही अजित पवार यांच्याकडं उमेदवारीची मागणी केली. मात्र, युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे गेल्याने आपण अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचं समीर भुजबळ यांनी सांगितलं.