Maharashtra Politics : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) उद्देशून विषारी साप म्हटल्याने राजकारणात (Maharashtra Politics) गदारोळ उठला. भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केले. या सगळ्या प्रकरणात बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसला ठाकरे गटाची साथ मिळाली.
साप हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे. साप हा शेतीचा राखणदार आहे. भगवान शंकराच्या गळ्यातही साप आहे. भाजपचे लोक पंतप्रधान मोदी यांना शंकराचा अवतार मानतात. मग सापाचा एवढा तिटकारा का, असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला आहे. मोदी पुंगी वाजवितात आणि अंधभक्त त्यावर डोलतात, अशी टीका सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
या टीकेवर आता भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत महाराष्ट्रात सापाच्या पिल्लाला 30 वर्षे दूध पाजलं म्हणता, विषारी म्हणता, भाजपाच्या जीवावर मोठे झालात. मोदीजींच्या नावे मत मागताना हे आठवलं नाही का, मोदींच्या नावाने मते मागितली आणि पाठीत खंजीर खुपसला यालाच दंश करणे दुष्टपणा करणे असे म्हणतात.
भाजपा आणि मोदींना जनतेने लोकशाही पद्धतीने निवडून दिले आहे. काँग्रेसच्या गळ्यात जरूर पडा पण ते पडण्यासाठी कोणत्याही गोष्टीचे समर्थन करू नका, काँग्रेस अध्यक्षांनी माफी मागितली आहे, तुम्ही तेवढे संवेदनशील नाहीत याची जाणीव आहे, अशा शब्दांत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फटकारले आहे.