Maharashtra Election Result 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेकांसाठी धक्का देणारा ठरला. महायुतीने एक्झिट पोलचे अंदाज धुळीस मिळवत अभूतपूर्व यश मिळवलं. 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षानेही सरस कामगिरी केली. महाविकास आघाडीची पुरती दाणादाण उडाली. आता निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण होत असताना वंचित बहुजन आघाडी, मनसे आणि अन्य पक्षांना धक्का देणारी आकडेवारी समोर आली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या जवळपास 96 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
“निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अनेक सरप्राईज मिळतील” राज ठाकरेंचं सूचक विधान
उमेदवारांच्या डिपॉझिट जप्त होण्याच्या बाबतीत मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसह अन्य काही पक्षांची स्थिती चिंताजनक राहिली आहे. दोन्ही पक्षांच्या जवळपास 96 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निवडणुकीत 125 मतदारसंघात उमेदवार दिले होते. यापैकी 119 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने 200 मतदारसंघांत उमेदवार दिले होते. त्यापैकी 194 उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले आहे.
शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या सर्व पक्षांच्या साधारण 1 ते 10 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. मनसे, रासप आणि वंचितच्या 95 टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याने या पक्षांवर मोठी नामुष्की ओढवली आहे.
निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज भरताना काही ठराविक रक्कक डिपॉझिट म्हणून घेतली जाते. मतदानात जर या उमेदवारांना वैध मतांच्या एक षष्ठांशही मते मिळाली नाही तर त्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले जाते. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणं ही त्या पक्षांसाठी नामुष्कीचीच बाब ठरते. यंदाच्या निवडणुकीत मनसे आणि वंचित बहुजन आघाडी व्यतिरिक्त आणखीही काही पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं आहे.
“खूप अभिमान वाटतो बाबा..” वडिलांसाठी श्रीकांत शिंदेंची डोळे पाणावणारी पोस्ट
बहुजन समाज पक्ष, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), बहुजन रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन सेना, स्वाभिमानी पक्ष, संभाजी ब्रिगेड, एआयएमआयएम अशा एकूण 20 पक्ष आणि संघटनांच्या शेकडो उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांची मते खाण्याच्या उद्देशाने डमी, अपक्ष उमेदवार उभे करण्यात आले होते. अशा 2086 उमेदवारांपैकी 2049 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
शिवसेना 1
राष्ट्रवादी अजित पवार 5
राष्ट्रवादी शरद पवार 3
शिवसेना उबाठा 10
राष्ट्रीय समाज पक्ष 91
वंचित बहुजन आघाडी 194
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 119