पुणे : आजपासून पुण्यात 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा फड रंगणार आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत 900 हून अधिक पैलवान सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा सुरू होताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांनी या स्पर्धेवर आक्षेप घेतला. ही स्पर्धा अधिकृत नसल्याचा आरोप केलाय. मात्र या स्पर्धेला भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता असल्यानं ही स्पर्धा अधिकृत असल्याचा दावा आयोजकांनी केलाय.
काही दिवसांपूर्वी पैलवानांच्या डोपिंगचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यातच आजपासून मानाच्या अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला आजपासून पुण्यात सुरुवात होणार आहे. 10 ते 14 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडणारंय. यंदा मानाच्या गदेवर कोण नाव कोरणार? हे पाहावं लागणार आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्या हस्ते आज मंगळवारी सायंकाळी 6 वाजता करण्यात येणार असल्याची माहिती ‘महाराष्ट्र केसरी’चे प्रमुख संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेविषयी माहिती देण्यासाठी सोमवारी एक पत्रकार परिषद पार पडली. 65 व्या महाराष्ट्र केसरीच्या तयारीचा आढावा आणि भव्य मैदानाची पाहणी केल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी यंदाच्या स्पर्धेची माहिती दिली. कोथरुड येथील कुस्तीमहर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी पैलवान, कुस्तीप्रेमींच्या मेळ्यासाठी सज्ज झालीय.
भव्य 32 एकर जागेत ही क्रीडानगरी साकारली असून त्यात 12 एकरमध्ये 80 हजार आसनक्षमतेचे मैदान, दोन माती आणि तीन गादीचे आखाडे आहेत. अतिमहत्वाच्या व्यक्ती, पैलवान, महिला, पत्रकार यांच्यासाठी स्वतंत्र प्रेक्षागॅलरी उभारण्यात आल्या आहेत. 20 एकर जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आलीय. यासह आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा व्यवस्थेचे चोख नियोजन केलंय.