Download App

तळीरामांनी सरकारची तिजोरी भरली, मद्यविक्रीतून 14 हजार कोटींचा महसूल

मुंबई : कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर जगभरातील लोकांनी अत्यंत जल्लोषात नाचतगात नववर्षाचं स्वागत केलं. या सरत्या वर्षी तळीरामांनी देखील आपली इच्छा मनसोक्त पूर्ण केल्याचे दिसून आले. चालू आर्थिक वर्षामध्ये मद्याच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून सरकारी तिजोरीत चांगलीच भर पडली आहे.

कोरोना काळात अर्थव्यवस्थेचे चाक लॉकडाउनमध्ये रुतल्याने सरकारसमोर महसूलाचा प्रश्न निर्माण झाला होता. आता, कोरोनानंतर आर्थिक गाडा पूर्वपदावर आल्याने चालू आर्थिक वर्षामध्ये मद्याच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षातील 9 महिन्यात 14,480 कोटींचा महसूल मिळाला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत 34.5 कोटी लिटर देशी मद्याची विक्री नोंदवण्यात आली. तर, 2021-22 या आर्थिक वर्षाच्या याच काळात राज्यात 25 कोटी लिटर मद्य विकले गेले होते. तर, सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत 23.5 कोटी लिटर विदेशी मद्याची विक्री झाली.

दरम्यान कोरोना काळात मद्यविक्रीयला पूर्ण पणे बंदी घालण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आर्थिक व्यवहार सुरळीत चालू ठेवण्यासाठी सर्वप्रथम दारूची दुकाने खुली करण्यात आली होती. आणि नंतर तळीरामांनी आपला घसा ओला करण्यासाठी सरकारची तिजोरी भरून टाकली होती.

एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या आठ महिन्याच्या या कालावधीत राज्यात 88 लाख लिटर वाइनची विक्री झाली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या याच काळात 66 लाख लिटर वाइन विकली गेली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षात वाइन विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us