Download App

जितक्या जागा शिंदेंना, तितक्याच राष्ट्रवादीलाही द्या; भुजबळांच्या वक्तव्याने जागावाटपात ट्विस्ट!

Chhagan Bhujbal on Seat Sharing : राज्यात महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. हा तिढा सोडविण्यासाठीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. बैठका घेत आहेत. मात्र अजूनही सकारात्मक तोडगा निघालेला नाही. यातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) यामध्ये नवा ट्विस्ट आणला आहे. मुंबईतील बीकेसी येथे अमित शाह, अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत भुजबळांनी नवाच फॉर्म्युला सांगितला. भुजबळ म्हणाले, जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतरच उमेदवार जाहीर करण्यात येतील. आम्ही या बैठकीत इतकंच सांगितलं आहे की शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील, तितक्याच जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या पाहिजेत.

Chhagan Bhujbal : प्रकाश शेंडगेंच्या नव्या पक्षाच्या घोषणेवर भुजबळांचा सल्ला; हा विचार ओबीसींच्या एकीमध्ये खंड 

भुजबळ पुढे म्हणाले, शेवटी सगळे एकत्रित बसून काय तो निर्णय घेतील. परंतु, मला असा विश्वास वाटतो की आमच्या पक्षाला जी आश्वासनं दिली गेली होती ती पूर्ण होतील. उमेदवाराच्या जिंकून येण्याचा निकषही महत्वाचा आहे. उमेदवार विचारात घेऊन कोण निवडून येऊ शकतो हा निकष माझ्यादृष्टीने महत्वाचा आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे यात काहीच शंका नाही. आज देशात सर्वात जास्त खासदार आणि आमदार त्यांच्याच पक्षाचे आहेत. आमची त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. जो काही निर्णय होईल तो सामोपचाराने होईल. जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु, यात काहीच तथ्य नाही. जी जागा आम्हाला मिळेल तिथे आम्ही जिंकू, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.

दरम्यान, भाजपने नुकतीच 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. यामागे अद्याप महायुतीमध्ये जागा वाटपाची बोलणी अंतिम झाली नसल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने भाजपकडे गतवेळी लढलेल्या सर्व 22 जागांची मागणी केली होती. तर राष्ट्रवादीने 10 जागांची मागणी केली आहे. या मागणीनुसार भाजपने जागा वाटप केल्यास भाजपच्या वाट्याला अवघ्या 16 जागा येतात.

भाजपाचा खास प्रस्ताव! CM शिंदेंना टेन्शन, राष्ट्रवादीसाठी वेगळा प्लॅन; कुणाला किती जागा ?

या जागावाटपाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. हा फॉर्म्यूला त्यांना मान्य नाही. परंतु,  भाजपाकडून दबाव वाढल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक झाली. काही वेळानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तिथून निघून गेले. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात बैठक झाली.

follow us