Sharad Pawar replies Rahul Narvekar : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याच्या राजकारणात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पवार यांनी आज पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली.
शकुनीमामाचं मिशन फत्ते! पवारांची भाकरी, सामनात पेढे; राणेंची राऊतांवर टीका
राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी सडकून टीका केली. नार्वेकर यांनी 90 दिवसात निर्णय घेतला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला होता.
त्यानंतर यावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी आत्ता कसं सांगणार ते काय करणार आहेत. याबद्दल मला काहीही माहिती नाही. विधानसभा क्षेत्रात मी लक्ष देत नाही. परंतु, ते काही क्रांतीकारी निर्णय घेणार असतील तर क्रांती झाल्यानंतर बघू, असा खोचक टोला पवार यांनी नार्वेकर यांना लगावला.
काय म्हणाले होते नार्वेकर?
1977 ते 78 दरम्यान विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. 77 मध्ये माझा जन्म झाला त्यावेळी बाळासाहेब देसाई यांच्यावर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आली. त्यांनी आपल्य आयुष्यात ज्या प्रमाणे क्रांतीकारी निर्णय घेतले त्यातूनच शिकून कदाचित मी पण लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईल.
त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये कुजबूज सुरू झाल्याचे लक्षात येताच नार्वेकरांनी लागलीच चिंता करण्याची काही गरज नाही. निर्णय काय असेल ते सांगितलेलं नाही, असे म्हणत बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी मेरिटवर निर्णय असे म्हटले. त्यालाही दुजोरा देत मेरिटवर निर्णय घेईन असे नार्वेकरांनी सांगितले.