Maharashtra Budget : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केल्यानंतर विधीमंडळात बुधवारी प्रचंड गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. दोन दिवसांपासून बॅकफूटवर गेलेल्या सत्ताधारी पक्षाला हे आयतेच कोलित मिळाल्याने त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला.
विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांना बॅकफूटवर ढकलण्यात आणि राऊतांवर हक्कभंग आणण्यात प्रचंड मेहनत घेतली. असे सगळे ठीकठाक सुरू असतानाच शिंदे गटाचे आ. भरत गोगावले बोलण्यासाठी उभे राहिले. संजय राऊतांवर टीका करताना गोगावले (Bharat Gogawale) यांची जीभ घसरली. त्यांच्याकडून संजय राऊतांबद्दल असा काही शब्द वापरला गेला की क्षणात सगळा खेळच पालटला. भाजप व शिंदे गटाच्या आमदारांची मेहनत अक्षरशः वाया गेली.
वाचा : ‘त्या’ व्हीपला भीक घालत नाही : भास्कर जाधवांनी गोगावलेंना मोडीत काढले..
‘संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे.भावनाही भडकत चालल्या आहेत. हे जर होऊ द्यायचे नसेल तर हक्कभंग आणला गेलाच पाहिजे. या माणसाला असे बोलण्याचा अधिकार कुणी दिला. माणसाने इतके #@$ नसले पाहिजे. इतका आगाऊपणा नसला पाहिजे,’ ‘आम्ही चोर आणि हे काय महाचोर आहेत का ?’ असे गोगावले यांनी म्हणताच विरोधकांनी नेमका गोगावले यांचा तोच शब्द पकडला अन् सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
विरोधक काही केल्या शांत होण्याच्या मानसिकतेत नव्हते.सभागृहाबाहेर केलेल्या वक्तव्याची जर तपासणी होत असेल, चौकशी होत असेल तर सभागृहात केलेल्या वक्तव्याचीही चौकशी केली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली.
Sanjay Raut : हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय? संजय राऊत यांना काय शिक्षा होऊ शकते?
या गोंधळातही विधानसभा अध्यक्षांनी त्यांनी केलेले वक्तव्य तपासून पाहू आता बसा, असे सांगत कामकाज पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. विरोधकांचा गोंधळ वाढत गेला. रोखून धरलेले कामकाजही सुरू झाले नाही. त्यामुळे अध्यक्षांना कामकाज तहकूब करावे लागले.
काही वेळानंतर कामकाज पुन्हा सुरू झाले. त्यावेळी गोगावले यांनी आपण वापरलेला शब्द मागे घेतो असे सांगितले. मात्र, या दरम्यान सभागृहातील सगळे चित्रच बदलले होते. इतक्या वेळेपर्यंत जे सत्ताधारी विरोधकांवर तुटून पडले होते. ते शांत दिसत होते. गोगावले यांच्या एका शब्दाने मेहनत घेऊन तयार केलेला प्लॅन फसल्याचा भाव या मंडळींच्या चेहऱ्यावर दिसत होता.