Supriya Sule : राज्यात दंगली होणेही गंभीर आहे. गृहमंत्रालयाचे हे मोठे अपयश आहे. गृहमंत्री फडणवीस यांना गृहमंत्रालय झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यात रामनवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात दंगल उसळली होती. या घटना तसेच खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीवरून त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले.
खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शनिवारी सकाळपासूनच या प्रकरणी प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही यावर संताप व्यक्त करत राज्य सरकावर निशाणा साधला आहे. ‘लोकप्रतिनिधींना वारंवार अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत याचा अर्थ गृहखात्याचा वचक, दरारा नाही काय ?’ असा सवाल त्यांनी ट्विटद्वारे केला आहे.
‘महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना एका व्यक्तीने फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. देशातील एका लोकप्रतिनिधीला जर अशाप्रकारे धमकी दिली जात असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे.’
धमकीनंतर संजय राऊत बोलले; म्हणाले, गद्दार गटाच्या आमदारांसाठी…
संजय राऊतांना सुरक्षा द्या
‘केंद्र तसेच महाराष्ट्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा देण्याची गरज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी’, अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यामध्ये एके ४७ ने हत्या करण्याची धमकी देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास हा मेसेज आला असून त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे.
तयारीला लागा ! तीन महिन्यांत निवडणुकांचा धुराळा ? ; सहकारमंत्र्यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून हा धमकीचा मेसेज आला असल्याचे त्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलं आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Musewala) प्रमाणेच दिल्लीत संजय राऊतांचीही हत्या करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणावर राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली होती. राऊत म्हणाले, की विरोधकांना अशा धमक्या येतात पण, सरकार गांभीर्याने घेत नाही. सगळी यंत्रणा गद्दार आमदारांच्या सुरक्षेसाठी लावल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढेपाळली आहे.
मला कळलंय की सलमान खानला ज्यांनी धमकी दिली त्याच गँगच्या माध्यमातून धमकी आली आहे. त्यातल्या काहींना पकडलंय असेही समजले आहे. असं झालं असेल तर त्यासाठी पोलिसांचा आभारी आहे असे राऊत म्हणाले.