Download App

सरकारचा खडा तमाशा! एक तुतारी वाजवेल, दुसरा नाच्या होईल, तिसरा घुंगरू बांधेल; वडेट्टीवारांचे खोचक बोल

Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यापासून राज्य सरकारवर घणाघाती टीका सुरू केली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्याकडून होत असलेल्या गौप्यस्फोटांनी राजकारण ढवळून निघाले आहे. आताही त्यांनी सध्याच्या राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

पूर्वी राज्यात सरकारचे नाटक सुरू होते. आता त्याचे विदर्भातील खड्या तमाशात रुपांतर होईल. यात कुणी तुतारी वाजवेल, कुणी नाच्या होईल व एखादा पायात घुंगरू बांधून नाचेल, असे ते म्हणालेत. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी पक्षातील काही आमदारांनी दबाव टाकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्रीपदे घेतल्याचा गौप्यस्फोट केला होता. विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या या विधानाचा दाखला देत सरकारवर तुफान टीका केली.

कांद्याच्या वांद्यात फडणवीसांची मध्यस्थी; मोदी सरकारचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

सध्याचं सरकार हे तीन तिघाडा काम बिघाडा असे सरकार आहे. कोण काय बोलतंय?, कोण काय शोध लावत आहे?, कोण कुणावर कुरघोडी करतोय?, कोण म्हणतो माझी बायको आत्महत्या करेल म्हणून मंत्रीपद मागतो, अशी वक्तव्ये केली जात आहेत. त्यांच्या या कारभाराला आता जनता वैतागली आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

विद्यमान सरकार नेमके कोण चालवत आहे? मुख्यमंत्र्यांवर उपमुख्यमंत्री कुरघोडी करतात. नक्की मुख्यमंत्री कोण हेच आम्हाला कळत नाही? सध्याच्या सरकारवर कुणाचा कंट्रोल आहे? हे ही समजत नाही. राज्यात अगोदर सरकारचे नाटक सुरू होते. या नाटकाचे आता विदर्भातील खड्या तमाशात रुपांतर होताना दिसून येत आहे. या तमाशात कुणीतरी तुतारी वाजवताना दिसेल, कुणी नाच्याची भूमिका बजावेल, तर कुणीतरी एकजण पायाला घुंगरू बांधून नाचेल, अशी खोचक टीका वडेट्टीवार यांनी केली.

कुठला सैनिक देशाचे अन् मालमत्तेचे नुकसान करतो; रवींद्र चव्हाणांचा मनसेवर लेटर बॉम्ब

राज्यातील नागरिकांनाही हा तमाशा लवकरच दिसेल. ट्रिपल इंजिनचे सरकार असल्याचा दावा केला जात आहे. पण या सरकारला ड्रायव्हरच नाही. जो येईल तो इंजिन चालविण्याचा प्रयत्न करत आहे. या सरकारचा कंट्रोल कुणाकडे आहे की ही गाडीच विना ड्रायव्हरची आहे, असा खोचक सवाल वडेट्टीवार यांनी केला.

बांग्लादेश सीमेवर हजारो टन कांदा पडून

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढविल्याने राज्यात हाहाकार उडाला आहे. या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत. या मुद्द्यावरही वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. सरकारने लहरी निर्णय घेत 40 टक्के निर्यात शुल्क लावले. यामुळे कांद्याच्या भावात 10 ते 12 रुपये घसरण झाली. या शुल्कवाढीमुळे बांग्लादेश सीमेवर हजारो टन कांदा पडून आहे. त्यानंतरही सरकार काहीच गांभीर्याने घेत नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

follow us