Maharashtra Police : सत्तेत येताच आधीच्या सरकारच्या योजना, घोषणा आणि सरकारी अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्णय बदलण्याचा परिपाठ भाजप सरकरच्या काळातही सुरुच आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी कथित खंडणी प्रकरणात आघाडी सरकारने डीसीपी पराग मणेरे (Parag Manere) यांना निलंबित केले होते. हा निर्णय रद्द करत महायुती सरकारने मणेरे यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेतले होते. आता तर त्यांची भारतीय पोलीस सेवेत (IPS) पदोन्नती करण्यात आली आहे. केंद्रीय गृह विभागाने नुकतेच याबाबतचे आदेश दिले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची भारतीय पोलीस सेवेत पदोन्नती करण्यात आली आहे. त्यात पराग मणेरे यांचेही नाव आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी परमबीर सिंग यांना निलंबित केले होते. याच प्रकरणात डीसीपी पराग मणेरे यांच्यावर खंडणी आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामुळे ठाकरे सरकारने मणेरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना सेवेतून निलंबित केले होते. परंतु, ठाकरे सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप सरकार सत्तेत आले.
या सरकारने आधीच्या सरकारचे निर्णय रद्द करण्याचा सपाटाच सुरू केला. यातच पराग मणेरे यांना ऑगस्ट 2022 मध्ये पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले होते. त्यानंतर आता आणखी मोठा निर्णय घेत मणेरे यांच्यासह पाच अधिकाऱ्यांची भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) पदोन्नती करण्यात आली आहे.
पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलातील समादेशक नम्रता पाटील, पुणे ग्रामीण पोलीस दलातील बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, हिंगोलीतील राज्य राखीव पोलीस दलातील समादेशक पौर्णिमा गायकवाड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नांदेड कार्यालयाचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे आणि ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांची पदोन्नती करण्यात आली आहे.